Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Solapur › बाजार समितीत भाजप सोडून कोणाशीही युती 

बाजार समितीत भाजप सोडून कोणाशीही युती 

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 8:50PMसोलापूर : प्रतिनिधी 

त्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप सोडून कोणाशीही युती करा, असे आदेश पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले असून येत्या बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची युती होणार असल्याच्या चर्चेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

शनिवार तिर्‍हे येथे भारत जाधव यांच्या शेतात हुरडा पार्टीसाठी राज्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील सहपत्नी आले होते. यावेळी माजी आ. दिलीप माने, राजू सुपाते, भारत जाधव, सरंपच भारत घोडके यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी बाजार समितीविषयी माजी आ. दिलीप माने यांना विचारणा केली असता निवडणुकी संदर्भात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यामुळे बाजार समितीवर वर्चस्व अबाधित राहावे, यासाठी भाजप सोडून कोणाशीही युती करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार भविष्यात पॅनल करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर या विषयावर ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सध्या भाजपाला चांगले दिवस राहिले नाहीत. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकत्रित येऊन लढल्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची युती अटळ असल्यावर त्यांनी शिक्का मोर्तब केले आहे. तर दुसरीकडे दक्षिण सोलापूर तालुक्यतील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बसवराज बगले यांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांची गुप्त भेट घेऊन आगामी निवडणुकीविषयी चर्चा केल्याचे समजते. 

इच्छुकांची ज्येष्ठांकडे गळ, तर काही पक्ष सोडण्याच्या तयारीत

आगामी बाजार समितीच्या निवडणुकीत आपला विचार व्हावा, यासाठी इच्छुकांनी वरिष्ठ नेते मंडळींकडे फिल्डींग लावली असून सर्वसाधारण जागेवर आपल्याला संधी मिळावी, अशी इच्छा तिर्‍हेचे माजी उपसरपंच भारत जाधव आणि उत्तर पंचायत समितीचे सदस्य हरिदास शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींकडे केली आहे. 

त्यामुळे वरिष्ठ नेतेमंडळी याचा विचार करणार का, हे काही दिवसांतच दिसून येणार आहे, तर तिकीट न मिळालेल्या काहींनी पक्ष सोडण्याची तयारी ठेवल्याचे दिसत आहे.

भाजपाने बाजार समित्यांचे आर्थिक नुकसान केले : माने 

भाजपाने शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार दिला हे खरे असले तरी दुसरीकडे बाजार समित्यांचे आर्थिक नुकसान केले असून येणार्‍या निवडणुकीच्या खर्चापोटी निवडणूक शाखेने जवळपास 70 ते 80 लाख रुपये जमा करण्याच्या सूचना बाजार समितीला दिल्या आहेत. त्यामुळे हा खर्च बाजार समित्याकडून वसूल केला जाणार असल्याने बाजार समित्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे माजी आ. दिलीप माने यांनी यावेळी सांगितले.