Mon, Jun 17, 2019 03:02होमपेज › Solapur › भेदभाव न करता वंचित मुलांनाही गणवेश द्या

भेदभाव न करता वंचित मुलांनाही गणवेश द्या

Published On: Jul 03 2018 1:55AM | Last Updated: Jul 03 2018 1:28AMसोलापूर : प्रतिनिधी

जि.प. व नगरपालिकेत शिकत असणार्‍या सर्वच मुलांना गणवेश वाटप करण्यात यावे, मुलांत गणवेश वाटपात कोणत्याही प्रकारावरुन भेदभाव करु नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्यावतीने सोमवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्याकडे करण्यात आली. 

‘दै. पुढारी’मध्ये ‘या विद्यार्थ्यांचा दोष तरी काय’ या मथळ्याखाली स्तंभ प्रकाशित करण्यात आला होता. याची दखल घेत दोन्ही संघटनांनी सर्वच मुलांना मोफत गणवेश देण्याची मागणी केली आहे. सव्वा लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार असून या विद्यार्थ्यांचा दोष तरी काय, असा प्रश्‍न दैै. ‘पुढारी’ने उपस्थित केला होता. केवळ लिंग व जातीवरुन या शाळेतील  मुलांना गणवेश वाटपात दुजाभाव चक्क शासनाकडूनच करण्यात येत असल्याने एकाच शाळेत शिकणार्‍या परंतु गणवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांत न्यूनगंडाची भावना निर्माण होत आहे. 

शासनाने मुलांत भेदभाव करणारा प्रकार बंद करुन शाळेतील सर्वच मुलांना मोफत गणवेश द्यावा, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, प्रकाश ननवरे, राकेश डोंगरे, परशूराम पवार, अभिषेक मोरे आदींनी सीईओ डॉ. भारुड यांच्याकडे समक्ष भेटून केली. ग्रामीण भागातील जि.प. शाळेत शेतकरी, शेतमजूर व कामगारांची मुले शिकत असून ही सर्व मुले आर्थिक मागास असल्याने या सर्वांना गणवेश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. परशूराम पवार, अभिजित गव्हाणे, अभिषेक माने आदींनी यावेळी डॉ. भारुड व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्याकडे सर्वच मुलांना गणवेश वाटप करण्याची मागणी केली. सध्या शेतकरी व कामगारांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. सरकारच्या विचित्र धोरणामुळे मुलांच्या लहान वयात जातीभेद निर्माण होण्याचा प्रकार गणवेश वाटपावरुन होत असल्याने सर्वच मुलांना मोफत गणवेश वाटप करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. 
राज्य शासनाकडे सीईओंनी मागणी पाठविली

दै. ‘पुढारी’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांची भेट घेत पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याची मागणी केली. गणवेश वाटपात कोणताही दुजाभाव करु नये, अशीही मागणी केली. डॉ. भारुड यांनी त्यांची ही मागणी राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.