Sun, Aug 25, 2019 00:07होमपेज › Solapur › घोळवेवाडी ठरले जिल्ह्यातील पहिले पेपरलेस गाव

घोळवेवाडी ठरले जिल्ह्यातील पहिले पेपरलेस गाव

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 8:16PMबार्शी : गणेश गोडसे 

सोलापूर जिल्ह्यातील व बार्शी तालुक्याच्या सरहद्दीवरील घोळवेवाडी या डोंगरमाथ्यावर वसलेल्या गावाने जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान मिळवून घोळवेवाडी अग्रस्थानी असल्याचे दाखवून दिले आहे. 

संगणकीकृत कामकाज

सरकार सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांत ऑनलाईन संगणक प्रणालीचा वापर करून सर्व कामकाज हे पेपरलेस पद्धतीने करताना दिसून येत आहे. शासनाच्या काही विभागांचे कामकाज यापूर्वीच पेपरलेस झालेले आहे. तोच धागा पकडून सरकारने सर्व ग्रामपंचायत कार्यालयेही पेपरलेस करण्याचा विडा उचलला आहे. त्यानुसार संबंधित सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकार्‍यांना याबाबत सूचना देऊन दप्तर संगणकीकृत व अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत कार्यालयेही पेपरलेस होण्यासाठी कामकाज करताना दिसत  असली तरी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी ग्रामपंचायतीने मात्र  आपल्या कामकाजात अग्रस्थानी राहून पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा बहुमान मिळवला आहे. 

डिजिटल सेवा कार्यरत

ग्रामविकास विभागाच्यावतीने ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता  आणण्यासाठी प्रशासकीय सेवा दाखले ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी तसेच व्यावसायिक, बँकिंग  आदी वेगवेगळ्या सेवा देण्यासाठी ‘आपले सरकार’ हा केंद्रस्तरीय  उपक्रम राबवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे.  महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 अनुसार ग्रामपंचायतीच्या  एकूण दप्तरांची संख्या 33 असून ही माहिती यापूर्वी लिखित स्वरूपात ठेवली जात होती. अर्थसंकल्प, पुनर्विनियोजन, नियतवाटप, ग्रामपंचायत जमाखर्च आदींची माहिती अभिलेखात ठेवली जात होती. घोळवेवाडी ग्रामपंचायतीने हे सर्व दप्तर  संगणकीकृत केले आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींबरोबर स्पर्धा करत  घोळवेवाडी गावातील ग्रामपंचायत  ई-ग्राम ठरली आहे. 

जिल्ह्यात ठरले सरस

कागदपत्रे गहाळ होणे, खराब होणे, कागदपत्रे जीर्ण होणे, नोंदी न होणे, आपल्या सोयीने दप्तरात बदल करणे आदी प्रकार सर्रास सगळीकडेच चालत होते. घोळवेवाडी हे पेपरलेस गाव ठरले असल्यामुळे हे गाव जिल्ह्यात सरस ठरले आहे.घोळवेवाडी ग्रामपंचायत पेपरलेस करण्यासाठी गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक पद्मराज जाधवर, सरपंच आशा अरुण दराडे,उपसरपंच श्रीमंत घोळवे, ग्रामपंचायत सदस्य देवदत्त तोगे, सुनीता घोळवे, सुमन घोळवे, रामकिशन घोळवे, त्रिशाला खाडे यांच्यासह संबंधित  अधिकारी व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. .

Tags : Solapur, Gholwewadi, became, first, paperless, village, district