Sat, Jul 20, 2019 03:03होमपेज › Solapur › मोहोळला विकासाचे रोल मॉडेल बिनविणार

मोहोळला विकासाचे रोल मॉडेल बिनविणार

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 05 2018 9:02PMमोहोळ : प्रतिनिधी

गेल्या दहा वर्षांपासून मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पाणी, आरोग्यविषयक समस्यांचा पूर्ण अभ्यास केला आहे. त्यामुळे येत्या काळात मतदारसंघातील समस्या सोडवून विकासकामांचे नवे पर्व सुरु करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. गेल्या दहा वर्षांपासूनचा मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतदारबांधवांशी असलेला संपर्क आपण कधीही तुटू दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याला संधी दिल्यास आपण मोहोळ विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची स्पष्टोक्ती पुणे येथील उद्योजक तथा राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार गौतमशेठ वडवे यांनी दिली.

मोहोळ शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व हितचिंतकांच्या भेटी घेऊन मतदारसंघातील मतदारबांधवांची ख्यालीखुशाली आपुलकीने जाणून घेण्यासाठी गौतमशेठ वडवे हे मोहोळमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधून निवडणूकविषयक भूमिका स्पष्ट केली. 

मोहोळ विधानसभेची निवडणूक लढविल्यानंतर तब्बल आठ वर्षांपासून मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांतील मतदारबांधवांशी संपर्क कायम ठेवला आहे. गत विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून मी तालुक्याचे पक्षश्रेष्ठी तथा आमचे मार्गदर्शक नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजन पाटील यांच्याकडे मागणी केली होती. मात्र त्यावेळी मला उमेदवारी मिळाली नाही. तरीही मी निराश न होता पक्षश्रेष्ठी आणि विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी मी संपर्क ठेवला आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही वडवे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आजवरच्या राजकीय वाटचालीमध्ये मला राष्ट्रवादीचे आमचे मार्गदर्शक शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या मार्गदर्शिका नेत्या खा. सुप्रिया सुळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहोत, असेही यावेळी वडवेशेठ म्हणाले.  मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणार्‍या पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांमधीलदेखील समस्यांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून मतदारसंघातील सर्व विकासकामे पूर्ण करुन मोहोळ विधानसभा मतदारसंघाला संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा रोल मॉडेल बनविण्याचा मनोदयदेखील यावेळी गौतमशेठ वडवे यांनी बोलून दाखविला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेडकरी चळवळीतील विचारवंत पोपटभाऊ कापुरे, सारंग चवरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.