Thu, Jul 18, 2019 10:27होमपेज › Solapur › उद्यान विभागाच्या कार्यालयाची तोडफोड 

उद्यान विभागाच्या कार्यालयाची तोडफोड 

Published On: Jan 05 2018 1:29AM | Last Updated: Jan 04 2018 10:24PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

महापालिका आयुक्‍त कार्यालयात एका कामगार संघटनेकडून मंगळवारी झालेल्या गोंधळाची घटना ताजी असतानाच गुरुवारी राजकीय कार्यकर्त्याने मनपा उद्यानात हैदोस घालत तोडफोड केली. यामध्ये सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मंगळवारी कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी आयुक्‍त कार्यालयात घातपात करण्याचा प्रयत्न केला.  हिंसक आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न मनपा कर्मचारी तसेच पोलिसांनी हाणून पाडला. 

या प्रकरणाला दोन दिवस उलटताच गुरुवारी महापालिकेच्या रिपन हॉलमधील उद्यान कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. प्रभाग क्र. 7 मधील झाडेझुडुपे काढण्यासाठी उद्यान विभागाकडून वारंवार मागणी करूनही मजूर मिळत नसल्याने बाबा शेख नामक  एका नगरसेवकाच्या कार्यकर्त्याने गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास उद्यान विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. साडेसात वाजता उद्यान विभागातील मुकादम चन्नप्पा हत्तरगी हे कर्मचार्‍यांची हजेरी घेत होते. एवढ्यात शेख तिथे आला. त्याने प्रभागातील झाडेझुडुपे काढण्यासाठी मजूर देण्याची मागणी केली. यावर हत्तरगी हे संबंधित कर्मचार्‍याकडे मागणी करण्यास सांगताच शेख यांनी तेथील कर्मचार्‍यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरूवात केली. यानंतर त्याने संगणक, नव्याने बसविण्यात आलेले बायोमेट्रिक, टेबल, खुर्च्या, खिडकीचे दारे आदींची तोडफोड केली. कर्मचार्‍यांचे मस्टर फेकून दिले. यामध्ये सर्व साहित्यांचे मिळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटना घडल्यानंतर मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. 

या घटनेप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी सुरु होती. दोन दिवसांच्या अंतरात दोन झालेल्या घटना पाहता मनपाच्या विविध कार्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
 

महापालिकेच्या उद्यान विभागात कर्मचार्‍यांना धक्‍काबुक्‍की करुन कार्यालयातील साहित्यांची मोडतोड करुन 85 हजार रुपयांचे नुकसान करणार्‍याविरुध्द  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्यान विभागाच्या रिपन हॉलजवळील कार्यालयात गुरुवारी सकाळी  साडेसातच्या सुमारास  चणप्पा कलप्पा हत्तरगी (वय 60, रा. मुरारजी पेठ, निराळे वस्ती, सोलापूर) हे कर्मचार्‍यांची हजेरी घेऊन कामाचे वाटप करीत होते. त्यावेळी बाबा शेख याने दोन सफाई कर्मचार्‍यांची मागणी केली असता हत्तरगी यांनी एक कर्मचारी उपलब्ध आहे,

दुसरा कर्मचारी उपलब्ध होतो का हे पाहतो असे सांगितले. त्यावेळी हत्तरगी हे फोन लावत असताना बाबा शेख याने कार्यालयातील कर्मचार्‍यांना धक्‍काबुक्‍की करुन, शिवीगाळ व दमदाटी करुन कार्यालयातील साहित्यांची मोडतोड करुन 85 हजार रुपयांचे नुकसान केले तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे तपास करीत आहेत.