Fri, Jul 19, 2019 07:21



होमपेज › Solapur › माढ्यातील कचर्‍याच्या ढिगार्‍यांनी पसरली दुर्गंधी

माढ्यातील कचर्‍याच्या ढिगार्‍यांनी पसरली दुर्गंधी

Published On: Jul 03 2018 1:55AM | Last Updated: Jul 03 2018 1:01AM



माढा : मदन चवरे

माढा शहरात गर्दीच्या ठिकाणांसह लोकवस्तीतही अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग लागल्याने शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या कचर्‍याच्या ढिगाकडे नगरपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेच्याबाबतीत नागरिकांना भित्तीपत्रकाद्वारे उपदेश करणार्‍यांचे हे काम म्हणजे लोकासांगे ब्रह्मज्ञान, असेच असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. 

माढा शहरात ठिकठिकाणी असलेल्या कचर्‍याच्या ढिगामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न अधिकच गंभीर होणार आहे. शहरात जोराचा पाऊस झाला, तर यापेक्षाही जास्त दुर्गंधी पसरणार असून प्लास्टिकचा कचरा वाहून जाऊन नाले तुंबण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 

माढ्यातील सुशिक्षित व उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या शुक्रवार पेठेत चार ठिकाणी कचर्‍याचे ढीग लागले आहेत. यामध्ये बाजार पटांगणातील लक्ष्मी-नृसिंह मंदिरामागे नव्याने बांधलेल्या घरकुलाला चिटकून कचर्‍याचा मोठा ढीग आहे. यामुळे कचरा डेपो याठिकाणीच आहे की काय असा संभ्रम निर्माण होतो. याच ठिकाणी असलेल्या खासगी जागेतील कोरड्या विहिरीतही व बाहेरही कचर्‍याचा ढीग आहे. जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर दोनच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाही कचरा मोठ्या प्रमाणात आहे. याच पेठेत एक कृषी केंद्र असून या दुकानात परिसरातील शेतकर्‍यांची गर्दी असते. त्या दुकानाच्या समोरील बोळातही कचर्‍याचा ढीग आहे. 

मुस्लिम समाजासह हिंदू धर्मियांचेही श्रध्दास्थान असलेल्या महिबूब सुबहानी दर्ग्याच्या परिसरातील जुना माढा-कुर्डुवाडी रस्ता याठिकाणीही कचर्‍याचा ढीग साचला आहे.

शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या कसबा पेठेतील निंबाळकर राजाच्या राजवाड्याच्या बुरुजाजवळ गावातील मुख्य रस्त्यावरच कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील प्रमुख चौक असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज चौकात महसूल भवनाच्या जागेत स्थानिक दुकानदाराकडून कचरा टाकला जात आहे. यामुळे याठिकाणीही कचरा दिसून येतो. एस.टी. स्टँडच्या प्रवेशद्वारावर कचर्‍याद्वारेच प्रवाशांचे स्वागत होते. याठिकाणी हॉटेलमधून निघणारा प्लास्टिकचा कचरा टाकला गेला आहे.

माढा नगरपंचायतमार्फत कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू करण्यात आली आहे. कचराकुंड्या नाहीत मग नागरिक व व्यावसायिकांनी साठलेल्या कचर्‍याचे काय करायचे हा प्रश्‍न त्यांच्यासमोर असतो मग ते अशा ठिकाणी कचरा टाकतात. ते वेळेत उचलण्याचे काम नगरपंचायतीकडून होत नाही. शहरातील धार्मिक स्थळे, शाळा, गर्दीची ठिकाणे अशा ठिकाणी असलेल्या या कचर्‍याच्या ढिगांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अस्वच्छतेमुळे आजाराला निमंत्रण
स्वच्छतेवर नगरपंचायत लाखो रुपये खर्च करते. नागरिकांना वेळोवेळी स्वच्छतेबाबत नगरपंचायत आवाहन करते. पण अनेक ठिकाणी घंटागाडी जात नाही, स्वच्छता करणारे कर्मचारी जात नाहीत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून भविष्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.