Tue, Jul 23, 2019 06:25होमपेज › Solapur › महिलांचा विनयभंग करत नागरिकांना त्रास देणारा ग्रामपंचायत सदस्य तडीपार

मोहोळ ग्रामपंचायत सदस्य एक वर्षासाठी तडीपार 

Published On: May 10 2018 8:32PM | Last Updated: May 10 2018 8:19PMमोहोळ : प्रतिनिधी

महिलांचा विनयभंग करुन गावातील नागरिकांना त्रास देत दहशत निर्माण करणार्‍या ग्रामपंचायत सदस्याला एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. गणेश नवनाथ खरात (रा. वाळुज ता. मोहोळ) असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. पंढरपूर उपविभागाचे दंडाधिकारी सचिन ढोले यांनी या सदस्यास तडीपार करण्याचा आदेश दिल्याची माहिती मोहोळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मोहोळ तालुक्यातील वाळुज ग्रामपंचायतीचा सदस्य गणेश खरात हा बळाचा वापर करुन महिलांना नेहमीच त्रास द्यायचा. तर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात मोहोळ पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मोहोळ न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. तरी देखील त्याने गावातील नागरिकांना धमकावणे, त्रास देणे इत्यादी प्रकारची कृत्ये करुन गावात दहशत निर्माण केली होती. त्यामुळे मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी वेळोवेळी त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या वर्तनुकीत सुधारणा होत नव्हती, उलट त्याच्या वागणुकीमुळे नागरिकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. 

मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गणेश खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मोहोळ पोलिस ठाण्या मार्फत संग्रहीत केली. आणि खरात यास एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे यासाठी पंढरपूरचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन ढोले यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावावर सुनावणी होवून प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी 20 एप्रिल 2018 रोजी गणेश खरात यास सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला. याबाबत मोहोळ पोलिसांकडून याबाबत अमंलबजावणी करण्यात आली. खरात यास तडीपार केल्याने मोहोळ तालुक्यातील संघटीत गुन्हेगारीने दहशत निर्माण करणार्‍या गावगुंडाचे धाबे दणाणले आहेत.