Tue, Jul 23, 2019 10:31होमपेज › Solapur ›  ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फटका; सोलापूरच्या जीएसटीत घट!

 ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फटका; सोलापूरच्या जीएसटीत घट!

Published On: May 18 2018 12:34AM | Last Updated: May 17 2018 11:47PMसोलापूर : विजय देशपांडे

गत जून महिन्यात केंद्र सरकारने संपूर्ण देशात ‘व्हॅट’ बंद करून जीएसटी (वस्तू व सेवा कराची) अंमलबजावणी करण्यास  प्रारंभ   केला. त्यामुळे सोलापूरच्या विक्रीकर कार्यालयात व्हॅटच्या तुलनेत जीएसटीतील व्यापार्‍यांची नोंदणीही सुमारे 20 टक्क्यांनी घटली आणि केंद्राच्या फिप्टी - फिप्टी धोरणामुळे 2016-17 या वर्षाच्या तुलनेत 2017-18 या वर्षात सोलापूर विभागाचे करसंकलनही घटल्याचे दिसून येते.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या जीएसटी कायद्याची अंमलबजावणी गेल्या जून महिन्यापासून संपूर्ण देशात लागू करण्यात आली. त्यापूर्वी व्हॅट कराची अंमलबजावणी होत होती. व्हॅट करप्रणालीत वस्तू विक्रीवर कर अकारला जात होता. परंतु आता जीएसटीमुळे थेट कंपनीतून होणार्‍या वितरण प्रणालीवरच कर अकारण्यात येत आहे. याशिवाय नव्या करप्रणालीत व्यापार्‍यांसाठी 10 लाखांची मर्यादा 20 लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे व्हॅटच्या तुलनेत जीएसटी करप्रणालीत कर भरणार्‍या व्यापार्‍यांची संख्याही घटली आहे.

2016-17 या वर्षात सोलापूर विभागात (सोलापूर आणि उस्मानाबाद) तब्बल 26 हजार 531 व्यापारी व्हॅट भरत होते. तर त्यांच्या माध्यमातून सोलापूर विभागास 701. 79 कोटींचा महसूल मिळत होता. परंतु जून 2017 रोजी केंद्र सरकारने व्हॅट कर रद्द करून त्याऐवजी जीएसटी कराची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे 2017-18 या वर्षात जीएसटीपूर्व 27 हजार 592 असलेली व्यापार्‍यांची संख्या व्यवहाराची मर्यादा वाढविल्यामुळे जून महिन्यात घटून 19 हजार 471 वर आली.  याशिवाय व्हॅट कराची 100 टक्के वसुली राज्यसरकराकडे होती. त्यामुळे उत्पन्नात प्रतिवर्षी महसुलात वाढ होत होती. परंतु जीएसटी कायद्यानुसार झालेल्या करसंकलनातून मिळालेल्या महसुलात 50 टक्के वाटा केंद्राचा आणि 50 टक्के वाटा राज्य सरकारचा असणार आहे. त्यामुळे सोलापूर विभागासह सर्वच विक्रीकर कार्यालयाच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. 

दरम्यान जीएसटी कायदा लागू झाल्यांतर गतवर्षी वार्षिक 701.79 कोटींचा महसूल 489.96 कोटींवर आला आहे. सोलापूर विभागात उस्मानाबाद तसेच बार्शी या दोन शहरांचा प्रामुख्याने समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात नोंदणीकृत व्यापार्‍यांची संख्या जास्त आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यात जीएसटीपूर्व महसूलदेखील उस्मानाबादच्या तुलनेत जास्त मिळत होता. परंतु जून 2017 पासून व्यवहाराची मर्यादा वाढविल्याने व्यापार्‍यांच्या संख्येत घट आली आहे.   मार्च 2017 ते जून 2017 या कालावधीत 186.78 कोटी महसूल व्हॅटच्या माध्यमातून मिळाला होता. जीएसटी लागू झाल्यानंतर जून ते एप्रिलदरम्यान 303 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला आहे.