Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Solapur › ‘जीआयएस’ सर्व्हेत 8500 मिळकती ‘रिफ्यूज्ड’ 

‘जीआयएस’ सर्व्हेत 8500 मिळकती ‘रिफ्यूज्ड’ 

Published On: Dec 13 2017 1:48AM | Last Updated: Dec 12 2017 10:31PM

बुकमार्क करा

सोलापूर : वेणुगोपाळ गाडी

 ‘जीआयएस’द्वारे शहरातील मिळकतींचा सर्व्हे करण्याचा मक्‍ता घेतलेल्या सायबरटेक कपंनीला मिळकतदारांनी मोजमाप घेण्यास मज्जाव केल्याने या कंपनीने अशा 8 हजार 500 मिळकती या ‘रिफ्यूज्ड’ दाखविल्या आहेत. यामध्ये कुलूपबंद वा पडिक मिळकतींचाही समावेश आहे.

महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘जीआयएस’च्या कामात गंभीर चुका असल्याचे नुकतेच सांगितले होते. कंपनी तसेच मनपा कर आकारणी व संकलन विभाग एकमेकांवर दोषारोप करीत असल्याने मिळकतींच्या सर्व्हेबाबत प्रचंड गोंधळ असल्याचे चित्र आहे. शहरातील नवीन मिळकतींचा शोध तसेच मनपाच्या रेकॉर्डवर असलेल्या मिळकतींविषयी माहिती देण्याचा मक्ता याआधी सन 2008 मध्ये देण्यात आला होता. ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या कंपनीला हा मक्‍ता देण्यात आला होता. या कामापोटी कंपनीला 72  लाख रुपये देण्यात आले होते. कंपनीचे काम बोगस असल्याचा आरोप झाल्याने तसेच या कामाबाबत असमाधान वाटल्याने सन 2014 मध्ये तत्कालीन आयुक्‍त चंद्रकांत गुडेवार यांनी हा मक्‍ता रद्द करुन तो सायबरटेक कंपनीला दिला होता. पाच कोटी 20 लाख रुपयांच्या या मक्त्याचे काम करावयास एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. पण हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने तद्नंतर दोनदा मुदतवाढ देण्यात आली. सर्व्हर, ग्राऊंड कंट्रोल पॉईंट, बेसमॅप, 15 विभागांचा डाटा मिळवून मिळकतींचे मॅपिंग करणे, सॉफ्टवेअर डेव्हलप करणे आदी कामांकरिता आजवर या कंपनीला सुमारे एक कोटींची रक्कम दोन वर्षांपूर्वी अदा करण्यात आली. तद्नंतर एक रुपयाही देण्यात आला नाही.

आजवर या कंपनीने सुमारे दोन लाख मिळकतींचा सर्व्हे केल्याची  माहिती आहे. यामध्ये सुमारे 36 हजार मिळकती नवीन (मनपाच्या रेकार्डवर नसलेले), तर 14 हजार 695 नळ बोगस असल्याचा शोध लावला आहे; मात्र, यावरून मनपा व कंपनी या दोहोंमध्ये वाद आहे. या सर्व्हेअंतर्गत तयार केलेल्या माहितीची पडताळणी मनपाकडून वेळेवर होणे गरजेचे होते; मात्र, तसे झाले नाही. अधूनमधून नमुना तपासणी मनपाकडून झाली. यामध्ये काही ठिकाणी कंपनीच्या, तर काही ठिकाणी मनपाच्या चुका आढळल्या.  या चुकांची दुरुस्ती करण्याचे आदेश मनपा आयुक्‍तांनी दिले आहेत. या चुकांची दुरुस्ती तसेच उर्वरित मिळकतींच्या सर्व्हेसाठी आणखी किती अवधी लागणार याचाही सविस्तर आराखडा त्यांनी कंपनीकडून मागविला आहे. 


केलेल्या कामांची बिले अदा होत असल्याचे सध्या कंपनीकडून सर्व्हेचे काम संथगतीने होत आहे. पूर्वी 200 पथके कार्यरत होती. बिल मिळत नसल्याने ही संख्या सध्या 75 वर असल्याचे सांगण्यात आले. मिळकतींचा सर्व्हे करताना आजवर हजारो मिळकतदारांनी कंपनीच्या लोकांना घरात येऊ दिले नाही, असा कंपनीचा अनुभव आहे. याशिवाय घर कुलूपबंद असणे वा पडिक असणे  हीदेखील कारणे असल्याने कंपनीने अशा मिळकतींचे अंदाजे मापे घेऊन ‘रिफ्यूज्ड’ म्हणून दाखविल्या आहेत. कंपनीने यापैकी काही मिळकती चक्क नवीन मिळकतींमध्ये दर्शविल्या आहेत. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. 

एकंदर या कामाबाबत सध्या प्रचंड गोंधळ उडालेला आहे. एकमेकांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी कंपनी व मनपाच्या कर आकारणी विभागाला सुसूत्रता व समन्वय ठेऊन काम करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा लागेल, एवढे मात्र नक्की.

अन्यथा महापालिकेला प्रचंड मोठ्या कर तुटीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.