Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Solapur › वृक्षारोपणासाठी आमदारांनाही निधी

वृक्षारोपणासाठी आमदारांनाही निधी

Published On: Apr 24 2018 1:08AM | Last Updated: Apr 23 2018 8:16PMसोलापूर : महेश पांढरे

सध्या पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल आणि निसर्गावर होणारा त्याचा वाईट परिणाम याचा राज्य शासनाने गांभीर्याने विचार केला आहे. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात आमदारांना मिळणार्‍या स्थानिक विकास निधीपैकी 5 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतचा निधी वृक्षारोपण आणि त्याच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी करण्याचे अधिकार आता आमदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघात वृक्षारोपणाची चळवळ वाढावी यासाठी आमदार आता 5 ते 25 लाख रुपयांपर्यंत खर्चाची शिफारस करू शकतात.

गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना हाती घेतली असून यामध्ये शासनाच्या प्रत्येक विभागाला यामध्ये सहभागी करुन घेतले आहे तसेच त्यांनी वृक्षलागवड करून ती झाडे जतन करण्याचे उद्दिष्टही त्यांना देण्यात आले आहे. मात्र यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद दिली नव्हती. त्यामुळे या शतकोटी वृक्षलागवडीला काही प्रमाणात अडचणी येत होत्या. त्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने आमदान निधी खर्चाबाबत नव्याने काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघात वनमहोत्सवासाठी 5 लाख रुपये  ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चास मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी त्या विधानसभेचा आमदार मतदारसंघात वनमहोत्सव साजरा करण्यासाठी आणि वृक्षलागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निधी खर्च करण्यास यापुढे शिफारस करु शकणार आहे.

Tags : Solapur, Funds, MLA,  tree, plantation