Sat, Mar 23, 2019 18:17होमपेज › Solapur › केरळ पूरग्रस्तांसाठी मध्य रेल्वे धावली

केरळ पूरग्रस्तांसाठी मध्य रेल्वे धावली

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 07 2018 11:01PMसोलापूर : प्रतिनिधी

केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून राष्ट्रीयस्तरावर मदत व बचावकार्य सुरू आहे. शासनाच्या प्रत्येक विभागातील कर्मचार्‍यांनी ऑगस्ट महिन्याच्या पगारातून केरळला आर्थिक मदत केली आहे. तसेच मध्य रेल्वेच्या पाचही विभागांतून कोट्यवधी रुपयांची मोफत मालवाहतुकीची सेवा देण्यात आली आहे. तसेच रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या पगारामधूनदेखील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी देण्यात आला आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकाराने रेल्वेने केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कंबर कसली आहे. विविध सरकारी व सार्वजनिक उपक्रमांमधून केरळकडे जाणारे अनेक साहित्य पाठविण्यासाठी मध्य रेल्वेच्या पाचही डिव्हिजनकडून विशेष सेवा देण्यात आल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेमध्ये एकूण पाच डिव्हिजन आहेत. त्यामध्ये सोलापूर, पुणे, मुंबई, नागपूर व भुसावळ या विभागांमार्फत मध्य रेल्वेचे कामकाज चालते. 5 सप्टेंबरपर्यंत मध्य रेल्वेच्या पाचही डिव्हिजनमार्फत 5949.23 टन साहित्य मोफत किंवा कोणतेही भाडे न आकारता केरळ राज्यात पाठविण्यात आले आहे. पाचही डिव्हिजनमध्ये पार्सल विभागात काम करणार्‍या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी 35 विशेष पार्सल व्हॅगनची सोय केली होती.

केरळला आर्थिक मदत देताना रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी व अधिकार्‍यांनी ऑगस्ट महिन्याच्या पगारामधून देणगी दिली. एकूण 6 कोटी 62 लाख 60 हजार रुपयांपर्यंतची पगारातून रक्कम रेल्वेकडून केरळला देण्यात आली. ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ)कडे पाठविण्यात आली आहे.

मध्य रेल्वेकडून मोफत मालवाहतूक
मध्य रेल्वेच्या पाचही डिव्हिजननुसार 5949.23 टन मालाची मोफत मालवाहतूक करण्यात आली. 35 विशेष पार्सल व्हॅगनची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये मुंबई - 317.35 टन, पुणे - 131.30 टन, भुसावळ-351.88 टन, नागपूर-39.4 टन, सोलापूर - 9.26 टन माल पार्सल व्हॅगनद्वारे कोणतेही भाडे न आकारता केरळला पाठविण्यात आला.