Fri, Jul 19, 2019 00:57होमपेज › Solapur › बनावट विद्यार्थी बसवून पुणे विद्यापीठास फसविले

बनावट विद्यार्थी बसवून पुणे विद्यापीठास फसविले

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 12:58AMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरच्या महाविद्यालयात बनावट विद्यार्थ्यास बसवून पुणे विद्यापीठाची फसवणूक केल्याप्रकरणी लातूरच्या एकासह तिघांविरोधात सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काप्स यूआरके रेसिडेन्सी सर्व्हेचे समन्वयक बाळू पांडुरंग कापडणीस  यांनी याबाबत फिर्याद दिली. 

यावरून अमोल प्रेमनाथ सरवदे (वय 34, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे, मूळ रा. निलंगा, जि. लातूर) यासह अनोळखी दोघे अशा तिघांवर तोतयागिरी करून ठकवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 
पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकरिता संशयित आरोपी अमोल सरवदे याने जानेवारी महिन्यात सात रस्ता येथील सोलापूर परीक्षा केंद्र असलेल्या संगमेश्‍वर कॉलेज येथे बनावटपणे परीक्षा दिली. सेट परीक्षेकरिता पुणे विद्यापीठाच्या ई-मेल आयडीवरून अर्जामध्ये नमूद केलेल्या त्याच्या ई-मेल आयडीवर संदेश पाठवून त्याचे आधारकार्ड व इतर कागदपत्रे पाठविण्याबाबत कळविले असता सेट परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेला अमोल याचे छायाचित्र व आधारकार्डवरील छायाचित्रामध्ये साम्य नसल्याचे दिसून आले. त्यास चौकशीसाठी बोलाविले असता आरोपी अमोलने पुणे केंद्र निवडलेले अमोल प्रेमनाथ सरवदे याच्यामध्ये साम्य असल्याचे निदर्शनास आले. अमोलने पुणे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन वेगवेगळे अर्ज करून जानेवारीच्या परीक्षेस बनावट विद्यार्थासोबत संगनमत करून त्यास सोलापूर येथील संगमेश्‍वर कॉलेज येथे परीक्षेस बसवून सेट परीक्षा देऊन सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.