Wed, Apr 24, 2019 22:18होमपेज › Solapur › दैवी शक्ती असल्याचे सांगून व्होळे येथील शेतकर्‍याची फसवणूक

दैवी शक्ती असल्याचे सांगून व्होळे येथील शेतकर्‍याची फसवणूक

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 9:27PM

बुकमार्क करा

करकंब :वार्ताहर 

तुमच्या घरात वास्तुदोष आहे, त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे. शिवाय तुम्हाला शारिरीक वेदना होऊन मुलाचे लग्नही ठरणार नाही. परंतु, आपल्याकडे दैवी शक्ती असून या संकटातून तुमची मुक्तता करतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी करकंब पोलिस जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. संतोष गंगाराम मंडाळे यास अटक करण्यात आली आहे.

आरोपी संतोष गंगाराम मंडाळे व बाबासाहेब ढवळे (दोघे रा.जुजगव्हाण, जि.बीड.) यांनी व्होळे (ता.पंढरपूर) येथील मारुती चौंडे यांना त्यांच्या घरी येऊन तुमच्या घरात वास्तूदोष असून तो दूर करण्याची आपल्याकडे दैवी शक्ती आहे. त्यासाठी तुम्ही मी सांगतो ती पूजा करा, घरात सोन्याचा नारायण नागबळी द्यावा लागेल असे सांगितले.  

प्रत्यक्ष नारायण बळी विधी करताना आरोपीने तांदूळ, नैवेद्य व इतर साहित्य आणि सोन्याचा नाग एका मडक्यात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर शनिवार सकाळी आठ वाजता उत्तर पूजा करण्याचे वेळी  अशा विधींवर विश्‍वास नसलेला मारुती चौंडे यांचा मुलगा महादेव याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पंढरपूर शाखेचे अध्यक्ष  प्रा. सचिन पारेकर, कार्याध्यक्ष विकास आदमिले व शुभम खपाले यांना उत्तरपूजेच्या वेळी उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून पुरलेले मडके आरोपीस बाहेर काढण्यास लावले. 

तेव्हा त्यात सोन्याचा नाग नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. तेव्हा आपण फसवले गेलो असल्याची जाणीव चौंडे कुटुंबीयांना झाली व त्यांनी करकंब पोलिसात धाव घेतली.

 त्याचवेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेचे अ‍ॅड. गोविंद पाटील, सुधाकर काशीद, धर्मराज चवरे, रमेश ढास, आदी करकंब पोलिस ठाण्यात दाखल झाले व त्यांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. संशयीत आरोपीकडून सोन्याचा बनविलेला पूजेमधील नाग जप्त करण्यात आला आहे.