Mon, Jan 21, 2019 19:10होमपेज › Solapur › बालसुधारगृहातून चार बालगुन्हेगारांचे अपहरण

बालसुधारगृहातून चार बालगुन्हेगारांचे अपहरण

Published On: Apr 25 2018 11:55PM | Last Updated: Apr 25 2018 11:29PM
सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील  सदर बझार परिसरातील बालसुधारगृहातून विविध गुन्ह्यांमधील चार  बालगुन्हेगारांनी बालसुधारगृहाच्या मेनगेटचे कुलूप चावीने उघडून पलायन केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात त्या बालगुन्हेगारांच्या अपहरणाबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून याबाबत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बालसुधारगृहातील कर्मचारी दीपक दिलीप धायगुडे (वय 28, रा. गणेशनगर, आरटीओ कार्यालयाच्यापुढे, विजापूर रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.  बालसुधारगृहातून पळून गेलेल्या चौघांपैकी एकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाणे, मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून दुसर्‍याविरुध्द सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर लोहमार्ग पोलिसांनी दोन बालगुन्हेगारांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात हजर केले होते. या चौघांनाही न्यायालयाने बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. 20 एप्रिल रोजी सकाळी बालसुधारगृहात सहायक  फौजदार डी. के. बर्‍हाणपुरे हे ड्युटीस असताना ते नैसर्गिक विधीसाठी गेले होते. त्यावेळी काळजीवाहक मोहन चराटे हेसुध्दा फ्रेश होण्यासाठी जवळच्या नळावरती गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन वरील चारही बालगुन्हेगारांनी कुठल्या तरी चावीचा वापर करीत गेटचे कुलूप उघडून शयनगृहातून बाहेर येऊन बालसुधारगृहाच्या मेनगेटमधून बाहेर येऊन पलायन केले. 
याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात बालसुधारगृहाच्या मेनगेटच्या बाहेर आल्यानंतर कोणीतरी या चौघांना फूस लावून पळवून नेले म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.