Sat, Apr 20, 2019 09:56होमपेज › Solapur › डोळ्यात चटणी टाकून 11 लाख लुटणारे चौघे जेरबंद

डोळ्यात चटणी टाकून 11 लाख लुटणारे चौघे जेरबंद

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:22AMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

डोळ्यात चटणी टाकून अकरा लाख रुपये लुटून पोबारा करणार्‍या चौघांना करमाळा पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या असून करमाळा न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची (रविवार, 29 एप्रिल) पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. करमाळा पोलिसांनी कसलाही धागादोरा नसताना अवघ्या 24 तासात या गुन्ह्यात चौघांना पकडल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

तानाजी विलास दणाणे (वय 25), रा. मुंगशी, ता. माढा), सर्फराज अली मोमीन (30, रा. कळंब, ता. बार्शी), आरिफ हानिफ मोमीन ( 22) व आझिम फैज मोमीन (25 दोघेही रा. परंडा, जि. उस्मानाबाद) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. ही कामगिरी करमाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, हवालदार सचिन बनकर, प्रवीण साठे, अनिल निंबाळकर, योगेश चितळे, अनिल जगदाळे यांच्या पथकाने केली. याची फिर्याद ब्रह्मदेव शहाजी कोकणे (वय 25 रा. देवगाव) याने दिली होती.

 फिर्यादी ब्रह्मदेव कोकणे व त्याचा सहकारी तानाजी विलास दणाणे (रा. मुंगशी, ता. माढा) हे दोघे त्यांचे मालक भाऊसाहेब अर्जुन चौधरी (रा. देवगाव) यांच्या परंडा येथील सतीश लोखंड, स्टील अँगल या दुकानाची करमाळा, कर्जत, राशीन येथील अकरा लाख रुपयांची उधारीची वसुलीची रक्कम घेऊन मोटारसायकल वरून जात होते. कुर्डुवाडी-करमाळा रोडवरील फिसरे गावानजिक  कारमधून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी दुचाकीला कारन धडक मारून खाली पाडले.  दुचाकीवरील दोघांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या हातातील अकरा लाख असलेली पिशवी लुटून नेल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता.

याबाबत करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करून तत्काळ पोलिस निरीक्षक राजेश देवरेे यांनी तत्काळ हालचाली करत फिर्यादी कोकणे व साथीदार दणाणे याच्या माहितीवरून व दणाणे याच्या विसंगत माहितीवरूनच या गुन्ह्याचा प्राथमिक अंदाज बांधला. याचा छडा लावत संशयित दणाणे याची उलटसुलट तपासणीत व तफावतीत या गुन्ह्याचा छडा लावला. याबाबत दोन पथके तयार करून दोघांना परंडा येथून व एकाला कळंब येथून सात लाख रुपयांच्या मुद्देमालासह गजाआड केले. या चौघांना करमाळा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे हे करत आहेत.

Tags : Four Robbed, Crime, Robbery, Solapur