Thu, Dec 12, 2019 17:01होमपेज › Solapur › वाचन संस्‍कृतीसाठी 'त्‍याने' सुरू केले बैलगाडीमध्ये फिरते वाचनालय

'त्‍याने' सुरू केले बैलगाडीमध्ये फिरते वाचनालय

Published On: Aug 13 2019 7:56PM | Last Updated: Aug 13 2019 7:50PM
सोलापूर : प्रतिनिधी 

आपले स्‍व:तचे घर असावे, गाडी असावी अशी अनेकांची स्‍वप्ने असतात, मात्र अशा स्‍वार्थी जगात आपले एक वाचनालय असावे अशी भावना असणारा माणूस विरळाचं, पण अशा व्यक्‍तीही समाजात आहेत. ज्‍या सुसंस्‍कृत समाज घडविण्यासाठी धडपडत आहेत.

सोलापूर जिल्‍ह्‍यातील दक्षिण सोलापूर तालुका येथे शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर वसलेलं दर्गनहळ्ळी हे गाव आहे. या गावाची लोकसख्या जेमतेम साडेचार हजाराच्या घरात. येथे राहणारा काशीराज कोळी या (३० वर्षीय) युवकाने वाचनालयाचे स्‍वप्न पाहिले अन् ते सत्‍यात देखील उतरवले. त्‍याने बैलगाडीमध्ये फिरते वाचनालय सुरू केले आहे. इतकेच नाही तर तो बैलगाडीतून हे फिरते वाचनालय घेवून दर रविवारी गावात फिरतो आणि मुलांना पुस्‍तके वाचनाची संधी उपलब्ध करून देतो.

काशीनाथ कोळी हा युवक पूर्व विभाग वाचनालय सोलापूर येथे ग्रंथालय लिपिक म्हणून गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहे. त्याला वाचनाची प्रचंड आवड आहे. आपले छोटेखानी वाचनालय असावे हे त्याचे स्वप्न होते. पदरमोड करून एक वर्षांपूर्वी त्याने साडेपाच हजार रुपयांची दोनशे पुस्तके घेतली. या पुस्तक संग्रहातून वाचनालय सुरू केले. यासाठी श्रीमती वनिता कायत आणि सचिन बिजगे यांनी मदत केली.

अशा पध्दतीने त्‍याचा वाचनालयाचा प्रवास सुरू झाला. वाचनालय सुरू झाल्यावर मित्र तसेच कामांवरील अन्य सहकाऱ्यांना त्‍याने पुस्तके रद्दीत टाकण्याऐवजी मला द्या असं आवाहनही केलं. काशीनाथच्या या हाकेला प्रतिसाद देत अनेक मित्रांनी त्यांना पुस्तकही दिली. कुठल्याही सरकारी अनुदानाविना त्याच्या वाचनालयासाठी पुस्तक जमा झाली आहेत. त्‍याचबरोबर ग्रामस्थांना व लहान विद्यार्थ्यांना वाचनालयाची गोडी लागावी या उद्देशाने त्‍याने माऊली सार्वजनिक ग्रंथालय सुरू केले. 

इंटरनेटच्या जमान्यात मनोरंजनाची विपुलता यामुळे विद्यार्थी वाचनात रस दाखवत नाही असे वारंवार बोलले जाते. हे सतत आरडाओरडा करण्यापेक्षा वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्यक्ष कृतीवर भर देत, त्याने फिरते वाचनालय चक्क बैलगाडीत सुरू केले. गावाकडच्या विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचण्यासाठी ही चळवळ उभारली. ग्रामस्थांना काशीनाथ हे पुस्तके वाचण्यासाठी देतात तिही अगदी मोफत. पुस्तके देतात केवळ वाचून ती परत करण्याच्या अटीवर. घरच्या वाचनालयाची व्यवस्था त्यांचा भाऊ रवींद्र कोळी पाहतो.

ग्रंथालयात काम करता करता ग्रामस्थांना वाचनाची गोडी लावण्याचा वसा घेतलेला काशिनाथच्या डोक्यात पुढे बैलगाडीत फिरते वाचनालय सुरू करण्याची संकल्पना सुचली. यासाठी त्याने स्वतःच्या सूर्या आणि चंद्र्या नावाच्या बैलांना गाडीला जुंपले.  दर रविवारी गावात फिरून लोकांना पुस्तके वाचण्यासाठी दिली जातात. बैलगाडीत शंभर पुस्तके पाहायला मिळतात. त्याची ही छोटीशी भन्नाट आयडिया गावात चर्चेचा विषय आहे.

कोणती आहेत पुस्तके ?

आत्मचरित्र, माहितीपट, अनुवाद, कथा, शैक्षणिक, मनोरंजनात्मक आणि वर्तमानपत्रे या बैलगाडीत उपलब्ध असतात.

गाव तेथे ग्रंथालय ही संकल्पना रुजवण्यासाठी आणि गावातील प्रत्येक घटकांपर्यंत वाचन संस्कृती पोहोचविण्यासाठी गावांमध्ये ग्रंथालय सुरू केले आहे. प्रत्येकाला पुस्तके विकत घेणे शक्य नसल्यामुळे मी गावातच बैलगाडीमध्ये फिरते वाचनालय सुरू केले आहे तेही मोफत...

-काशीनाथ कोळी, माऊली ग्रंथालय संस्थापक