Sat, Apr 20, 2019 07:56होमपेज › Solapur › नाट्य परिषद नियामक मंडळासाठी सोलापूरसह चार ठिकाणी मतदान 

नाट्य परिषद नियामक मंडळासाठी सोलापूरसह चार ठिकाणी मतदान 

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 10:44PMसोलापूर : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाच्या सोलापूर जिल्ह्यातील 6 सदस्य निवडीसाठी रविवारी सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला अशा एकूण चार ठिकाणी मतदान घेण्यात आले. मतमोजणी जरी रविवारी रात्री होणार असली तरी निकाल 7 मार्चला जाहीर करण्यात येणार आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात नाट्य परिषदेच्या अनेक शाखा आहेत. एकट्या सोलापुरात सोलापूर शाखा, उपनगरीय शाखा तसेच महानगर शाखा कार्यरत आहे. परिषदेचे शहर-जिल्ह्यात मिळून सुमारे दोन हजार सभासद आहेत. परिषदेच्या घटनादुरुस्तीनुसार 300 सभासदांमागे 1 नियामक मंडळ सदस्य निवडता येतो. सोलापूरची सभासदसंख्या लक्षात घेता एकूण 6 नियामक मंडळ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. याकरिता रविवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मोदीखाना येथील शाखेच्या कार्यालयाजवळ मतदान घेण्यात आले. सोलापूरच्या तीन शाखांबरोबरच बार्शीचे मतदानही याठिकाणी घेण्यात आले.

पंढरपूर व अकलूज शाखेच्या सभासदांचे मतदान पंढरपुरातील आयएमए हॉल, मंगळवेढा शाखेचे मतदान मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल  तर सांगोला शाखेचे मतदान सांगोल्यातील ज्योतिर्लिंग कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात आले. या निवडणुकीसाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नटराज व रंगकर्मी असे दोन पॅनेलचे उमेदवार आहेत. ‘नटराज’तर्फे जयप्रकाश कुलकर्णी, चेतनसिंह केदार, दिलीप कोरके, आनंद खरबस, सोमेश्‍वर घाणेगावकर, यतीराज वाकळे, ‘रंगकर्मी’कडून नागनाथ पाटील व गणेश यादव नशीब आजमावित आहेत. गुरु वठारे हे वैयक्तिक लढत आहेत. 

अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कृत नटराज पॅनेलसाठी प्रकाश यलगुलवार, विजय साळुंके, अजय दासरी, विठ्ठल बडगंची, ज्योतिबा काटे, धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ. मंदार सोनवणे, डॉ. सुभाष कदम, अमोल धाबळे, दत्तात्रय जगताप, सुहास मार्डीकर, बालाजी शिंदे हे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यरत होते. रंगकर्मी पॅनलसाठी दिनेश शिंदे, सुनील गुरव, अ‍ॅड. बाबू पाटील  प्रयत्नशील होते.  वठारे यांच्यासाठी दीपक देशपांडे, सुशीला व्हनसाळे, शिवानंद चलवादी आदींनी व्यूहरचना आखली होती. गत निवडणुकीतदेखील वठारे हे वैयक्तिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र त्यांचा दिलीप कोरके यांनी पराभव केला होता. या पार्श्‍वभूमीवर वठारे पुन्हा वैयक्तिकपणे नशीब आजमावित आहेत.  

रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान घेण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजता मतमोजणी होणार असून निकाल मात्र बुधवार, 7 मार्चला जाहीर करण्यात येणार आहे.