Sat, Jul 20, 2019 15:58होमपेज › Solapur › स्वयंशिस्त अंगीकारल्यास अपघात होणार नाहीत : पालकमंत्री

'स्वयंशिस्त अंगीकारल्यास अपघात होणार नाहीत'

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:18AMसोलापूर : प्रतिनिधी

देशामधील अपघातांमध्ये मरण पावणार्‍या लोकांची संख्या पाहता रस्ते अपघात रोखणे ही देशासमोरील मोठी समस्या असल्याचे दिसून येत आहे. रस्ते अपघात रोखायचे असतील तर वाहनचालकांच्या जनजागृतीबरोरच वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे मत  राज्याचे परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्‍त केले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 29 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती रंगभवन येथे करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक एस. वीरेश  प्रभू, महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्‍त नामदेव चव्हाण, अपर्णा गिते, कार्यकारी अभियंता मोरे, उपमुख्य कार्यकारी  अधिकारी बनसोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, दशरथ वाघुले, ज्येष्ठ पत्रकार राजा मानेे,  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य दिलीप कोल्हे, सारंग तारे आदी उपस्थित होते. 

देशांमध्ये रस्ते अपघाताची परिस्थिती मोठी बिकट असल्याचे सांगून पालकमंत्री देशमुख यांनी रस्ते वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात होऊन वाहनचालक मरण पावतो. त्यामध्ये देशाचे तर नुकसान होत असून त्याच्या कुटुंबाचेही नुकसान होते. त्यामुळे या अभियानामध्ये वाहनचालकांनी स्वयंशिस्त अंगीकारली पाहिजे. जेणेकरून अपघातांच्या संख्येत घट होईल. सरकारच्यावतीने या अभियानाच्या माध्यमातून अपघातांची संख्याही कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

यावेळी प्रास्ताविक करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी देशामध्ये 4 लाख 80 हजार अपघातांमध्ये 1 लाख 51 हजार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. देशात अपघातांच्या संख्येत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असून राज्यात 21 हजार अपघातात 12 हजारजणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातही सन 2017 मध्ये 80 जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात 512 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अपघातांची ही संख्या खूपच चिंताजनक बाब असून सध्या रस्ते चांगले असतानाही अपघातांच्या संख्येत कमी होताना दिसून येत नाही. एकूण अपघातांमधील 84 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले असून शहर व जिल्ह्यातील अपघातांची ठिकाणे शोधून काढून तिथे विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही खरमाटे यांनी 
सांगितले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राजकीय नेतेमंडळींनी पहिल्यांदा वाहतुकीचे नियम पाळावेत, असे सांगितले. त्या नेतेमंडळीचे अनुकरण कार्यकर्ते करतील. जिल्ह्यातील अपघातांची ठिकाणे शोधून काढून त्याठिकाणी उपाययोजना करण्यासाठी सरकारने निधी द्यावा, असेही मोहिते-पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी  उपायुक्‍त नामदेव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करुन अपघातांविषयी    आपली   संवेदनशीलता बोथट झाली असून वाहनचालकांनी रस्त्यावर अपघातग्रस्तांची मदत करावी, असेही चव्हाण यांनी 
सांगितले.

यावेळी सुरुवातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या वाहतुकीच्या नियमांविषयीच्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्‍वेता हुल्ले यांनी केले, तर आभार महामार्गचे संजय कदम यांनी मानले. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी, आरटीओ कार्यालयातील कर्मचारी, ट्रेनिंग स्कूलचे प्रतिनधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Tags : Follow Traffic Rules, Accidents, Minister, Vijaykumar Deshmukh,Solapur