Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Solapur › फ्लेमिंगोंने उजनी काठ बहरला 

फ्लेमिंगोंने उजनी काठ बहरला 

Published On: May 01 2018 1:18AM | Last Updated: Apr 30 2018 8:43PMसोलापूर : प्रतिनिधी 

पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या   जाणार्‍या   उजनी  जलाशयावर  उशिरा  का  होईना फ्लेमिंगोंचे  आगमन  झाल्याने  पक्षी  व निसर्गप्रेमींमध्ये  उत्साहाचे  वातावरण निर्माण  झाले  आहे. फ्लेमिंगोंच्या  आगमनामुळे  पक्षी निरीक्षक,  पर्यावरण  छायाचित्रकार  व निसर्ग  अभ्यासक आपल्या  कॅमेर्‍यात  फ्लेमिंगोंचे  विलोभनीय  सौंदर्य   टिपण्यासाठी सरसावले  आहेत. अकलूज  येथील पक्षी  अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी उजनीवर  भ्रमंती  करून या पक्ष्यांची माहिती दिली आहे. 

धरणनिर्मितीनंतर  धरणाच्या  पाणपृष्ठावर  वर्षानुवर्षे  हिवाळी  पाहुणे  म्हणून  विविध  प्रकारचे  पक्षी  आपल्या  उदरनिर्वाहासाठी  तसेच वंशाभिवृद्धीसाठी  नेमाने येतात. स्थलांतर  करून येणार्‍या  पाहुणे  पक्ष्यांपैकी  मनमोहक  सौंदर्याचे रूप  लाभलेल्या  फ्लेमिंगो  सध्या  कुंभारगाव, डिकसळ  रेल्वे  पूल, कोंढारचिंचोली  आदी  भागांतील भीमा नदीच्या  काठावरच्या  उथळ  पाण्यात  मासे,  खेकडे, गोगलगायींसह शंख-शिंपले  व अन्य  जलकिटकांवर ताव  मारण्यात  मग्न  आहेत.

गेल्यावर्षी  झालेल्या  समाधानकारक पर्जन्यमानामुळे  धरण  काठोकाठ  भरले होते शिवाय  यावर्षी  धरणाच्या  लाभक्षेत्रातील भूजल पातळीही  समाधानकारक   असल्यामुळे  धरण बरेच  दिवस  तुडुंब  भरून  होते.   त्यामुळे  जलाशयाच्या  काठावर  फिरून  चरणार्‍या पक्ष्यांना  खाद्यान्न  उपलब्ध  होत नव्हते. या  कारणामुळे  फ्लेमिंगोंनी  आपल्या  प्रवासाचे  वेळापत्रक बदलून  आगमन  लांबणीवर  टाकले होते.  गेल्या  महिन्यात  सोलापूर  शहरासाठी  तसेच  सिंचनासाठी  सातत्याने  केलेल्या  पाण्याच्या  विसर्गानंतर जलाशयाचा  काठ  उघडा पडून त्याठिकाणी  दलदल  निर्माण झाल्यामुळे  फ्लेमिंगो आपल्या उदरनिर्वाहासाठी  सरसावले आहेत. विविध प्रकारचे  बगळे, करकोचे,  कुदळे,  चमचेचोच इत्यादी  परिवारातील  फ्लेमिंगोंना फिनीकोप्टेरस रबर   या  शास्त्रीय  नावाने  ओळखतात.

मराठीत  त्यांना  रोहित, अग्निपंख  व  राजहंस  अशी नाव  आहेत.  या  पक्ष्यांच्या  पंखाखालील  भाग  लाल भडक  रंगाचा असतो. व ते आकाशात  झेप  घेतल्यावर लाल भडक रंगाचे  दिसतात  म्हणून  त्यांना अग्निपंख असे  नाव   नाव  दिले  आसे. ज्यावेळी  हे पक्षी  जमिनीवर  व उथळ  पाण्यात  उभारलेले  असतात  त्यावेळी  ते गुलाबी  रंगमिश्रित धवलवर्णीय  वाटतात. या कारणामुळे  त्यांना  रोहित  पक्षी  म्हणून  संबोधले  जाते. दूरवरून  दर  हिवाळ्यात  स्थलांतर  करून  महाराष्ट्रातील  विविध  जलस्थानावर  येणार्‍या  फ्लेमिंगोंचे दोन प्रकार  आहेत.  ते म्हणजे  ग्रेटर फ्लेमिंगो  वा लेसर फ्लेमिंगो.  

सोलापूर  जिल्ह्यातील  उजनी  जलाशयासह  इतर  अनेक  पाणवठ्यांवर  ग्रेटर  फ्लेमिंगो  येत  असतात, तर मुंबईजवळच्या   शिवडीच्या  खाडीत  लेसर फ्लेमिंगो   दरवर्षी  येतात.   ग्रेटर फ्लेमिंगो  हे शे-दोनशेच्या  थव्याने  हजारोंच्या  संख्येने गुजरात व पाकिस्तान सीमेवरील  कच्छच्या  रणातून  येतात. पावसाळ्यापूर्वी  हे पाहुणे पक्षी  वीण  घालण्यासाठी  पुन्हा  कच्छकडे  मार्गस्थ  होतात.