Tue, May 26, 2020 00:06होमपेज › Solapur › पाच वर्षातील कारभारामुळे सत्ता आमचीच येणार: देवेंद्र फडणवीस

पाच वर्षातील कारभारामुळे सत्ता आमचीच येणार: देवेंद्र फडणवीस

Last Updated: Oct 10 2019 2:25PM

मंगळवेढा (सोलापूर)  :  सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस.  मंगळवेढा :  प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षात माहितीचे सरकार म्हणून राज्यात चांगला कारभार केल्याने आमची सत्ता येणार असून विरोधक सत्तेत येण्यासाठी खोटी आश्वासने देत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस महायुतीचे उमेदवार सुधाकर पारिचारक यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यात आयोजित सभेत बोलत होते.  

यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते -पाटील, कल्याणराव काळे, उमेश परिचारक, शहाजी पाटील, शहाजी पवार, लक्ष्मण ढोबळे, राहुल शहा, संभाजी शिंदे, शिवाजी सावंत, गौरीशंकर बुरकुल, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्‍हणाले की, दुष्काळमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच पाच वर्षात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते निर्माण झाले आहेत. सर्वांना घरे, विज आणि आरोग्याबाबत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यात शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी दिली असून दुष्काळामध्ये जनावरांसाठी चारा छावण्या चालू केल्या. याउलट गेल्या पंधरा वर्षांमध्ये विरोधकांकडून सरकार चालवत असताना मोठ्या प्रमाणावर राज्‍यात फक्त आश्वासने मिळत गेली. 

मंगळवेढ्याच्या भागासाठी पाणी आम्ही आणले आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मतदारसंघासाठी संता सारख्या माणसाची गरज असल्याने सुधाकर परिचारक यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले. राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते खोट बोल पण रेटून बोल या वृत्तीने आपला अजेंडा चालवत आहेत, त्यामुळेच त्यांनी दिलेला शपथनामा हा कधीही पूर्ण न होणार असून यातून फक्त दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे,  अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली.

संत बसवेश्वर, संत चोखामेळा स्मारकाचे काम लवकरात-लवकर पूर्णत्वास नेणार असून या भागातील सर्व योजना मार्गी लावण्यासाठी आमच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सभेचे प्रास्ताविक प्रशांत परिचारक यांनी केले. सूत्रसंचालन भारत मुळे यांनी केले. आभार औदुंबर वाडदेकर यांनी मानले.