Mon, Aug 19, 2019 14:01होमपेज › Solapur › पाच हजार सहकारी संस्था आर्थिक बळकट करणार : सुभाष देशमुख

पाच हजार सहकारी संस्था आर्थिक बळकट करणार : सुभाष देशमुख

Published On: Mar 04 2018 1:38AM | Last Updated: Mar 03 2018 10:06PMसोलापूर : प्रतिनिधी

सरकारकडून एक रुपया न घेता अटल महापणन योजनेतून सहकार विकासाला गती दिली. यापुढील काळात राज्यातील पाच हजार सहकारी संस्थांचे आर्थिक बळकटीकरण करण्यात येणार आहे. सन 2000 साली बंद पडलेले राज्य सहकार महामंडळ पुन्हा सुरु करुन आर्थिक अडचणीत असलेल्या संस्थांना कमी व्याजदरात कर्ज देऊन या संस्थांना ऊर्जितावस्था प्राप्‍त करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी केले. 

सहकार परिषद व सहकार भारतीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषद व आदर्श सहकारी संस्था पुरस्काराचे वितरण शनिवारी दुपारी हुतात्मा स्मृती सभागृहात ना. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यापसीठावर सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चळेगावकर, महापौर शोभा बनशेट्टी, सहकार भारतीचे महामंत्री उदयराज जोशी, परिषदेचे स्वागताध्यक्ष अविनाश महागावकर, निमंत्रक भालचंद्र कुलकर्णी, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सुधाकरपंत परिचारक, जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कारंडे, दिलीपराव पतंगे, प्रशांत बडवे आदी उपस्थित होते. 
यावेळी ना. देशमुख म्हणाले, मजुरांच्या बँक खात्यावर मजुरी जाणार असेल तर मजूर सहकारी संस्थाचे सभासद अमर्याद वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल. सहकारात चुकीचे काम करु नका. राज्यातील 22 हजार विविध कार्यकारी सेवा सोसायटींपैकी निम्म्या संस्था तोट्यात आहेत.

मात्र अटल महापणन योजनेमुळे 850 संस्थांनी नवीन व्यवसाय सुरु करुन आपल्याच योगदान व कर्तृत्वाने संस्था बळकट केली आहे. सहकार क्षेत्र सामान्य माणसांशी जोडले गेले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या संस्था सुरु करण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा आहे. सहकाराकडे सरकार कधीही वाकड्या नजेरेने पाहात नाही, असे त्यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून संस्थांना 50 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येत असून याचे व्याज सरकार भरणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी ना. चरेगावकर म्हणाले, सहकार क्षेत्राला निम्मी लोकसंख्या जोडली गेली आहे. सहकारी संस्थांनी काळाच्या गरजेनुसार सभासदांकरीता संगणक साक्षरता अभियान सुरु करावे. विविध उपक्रम सुरु केले तर सहकारी संस्थांना चांगले दिवस येणार असल्याचे सांगितले. 

यावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, सहकारमंत्री चांगले निर्णय घेतात. मात्र अधिकार्‍यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. पतसंस्थांना वसुलीबाबतचे अधिकार देण्यात यावेत तरच वसुली चांगली होणार आहे. पुणे जिल्ह्यातील 80 पतसंस्था एका बँकेतील ठेवीमुळे अडचणीत आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  प्रारंभी जिल्हा उपनिबधंक अविनाश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भालचंद्र कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमात 50 उत्कृष्ट संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी राज्यभरातून सहकार क्षेत्रातील व्यक्‍ती व मान्यवर उपस्थित होते.