Fri, Mar 22, 2019 07:48होमपेज › Solapur › इंधन दरवाढ : पाच पक्ष एकवटले

इंधन दरवाढ : पाच पक्ष एकवटले

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 11:00PMसोलापूर : प्रतिनिधी

वाढलेली महागाई व भडकलेले पेट्रोल व डिझेल या इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, माकप, बसप आदी पक्षांतील नेत्यांनी एकत्रित येत सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी याबाबत पाचही पक्षांतील प्रमुख नेत्यांनी सायंकाळी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सोलापूरकारांनी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आपला व्यवसाय व दुकाने बंद करून बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी प्रकाश वाले यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य प्रदेश नेत्यांच्या आदेशावरून इंधन दरवाढीविरुद्ध सर्व समविचारी पक्षांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला असून जनतेने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी केले. मनसेचे नेते बाळासाहेब नांदगावकर यांच्या सूचनेनुसार समविचारी पक्षांसोबत जनतेच्या प्रश्‍नांबाबत एकत्रित येण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी मनसेचे शहराध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी दिली. 

परभणीनंतर सोलापुरात सर्वात जास्त दर इंधनासाठी आकारण्यात येत आहे. पेट्रोलसाठी सर्वाधिक 88 रुपये 40 पैसे, तर डिझेलसाठी 75 रुपये 85 पैसे प्रति लिटर दर आकारण्यात येत आहे. याशिवाय घरगुती गॅसच्या दरातही प्रचंड वाढ झाल्याने सरकारविरोधी सर्वसामान्य जनतेत रोष पसरल्याचे मत यावेळी माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्‍त केले.  रुपयाच्या बदल्यात डॉलरचे भाव वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे सुदीप चाकोते, नगरसेवक चेतन नरोटे, हेमा चिंचोळकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे, संतोष पवार आदी नेते उपस्थित होते. माकपचे नेते या पत्रकार परिषदेत उपस्थित नसले तरी त्यांच्याकडून पाठिंबा देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.