होमपेज › Solapur › अकलूज येथील देवकर खून प्रकरणी 5 जणांना जन्मठेप

अकलूज येथील देवकर खून प्रकरणी 5 जणांना जन्मठेप

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:43AMमाळशिरस : तालुका प्रतिनिधी 

अकलूज (ता. माळशिरस) येथील रणजित ऊर्फ भैय्या  देवकर खूनप्रकरणी माळशिरस जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी 5 जणांना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर 4 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्‍तता करण्यात आली आहे. दशरथ माने, सचिन जाधव, बालाजी कोळी, नितीन जगदाळे, अतुल ऊर्फ पिंटू मोहिते अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, दि. 17 सप्टेंबर 2015 रोजी  सायंकाळी 6 वाजून 45 च्या सुमारास रणजित देवकर हा हॉटेल उत्सवसमोर पानटपरीजवळ बसला  असताना, दशरथ माने, सचिन जाधव, बाल्या कोळी, भैय्या इंगळे, श्रावण बोरकडे, नितीन जगदाळे व इतरांनी तलवार व कोयते घेऊन  रणजित देवकर याच्यावर हल्ला केला. त्यावेळी फिर्यादी विक्रम कांबळे यांनी दशरथ माने यास त्याला कशाला मारता, तुमचे त्याने काय वाईट केले आहे, असे म्हणाला. त्यावेळी दशरथ माने याने, तू मागे सर नाही तर तुझ्यावर बारी येईल, असे धमकावून  सर्व जण मोटारसायकलवर बसून गिरझणीच्या दिशेने निघून गेले.

हल्ल्यानंतर रणजित हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. चेहर्‍यावर व डोक्यात अनेक वार झाल्याने चेहरा व डोके फुटून छिन्नविच्छीन झाले होते तो जागीच ठार झाला होता. या बाबत मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी देवकर याचा खून केल्याची फिर्याद अकलूज पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिस ठाण्याचे तत्कालीन पो. नि. विश्वास साळोखे  यांनी  तपास करून माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.  

या खटल्यात एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी व प्रत्यक्ष साक्षीदार कांबळे डॉ. शिंदे घटना स्थळावरील पंच तपासाधिकारी विश्‍वास साळोखे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.  सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेले पुरावे व जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड संतोष न्हावकर व अ‍ॅड संग्राम पाटील यांनी केलेला युक्‍तीवाद ग्राहय धरून न्या. आर.  आर. पटारे यांनी 5  आरोपींना भा.दं.वि. कलम 302 , 120 ब याप्रमाणे जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर या प्रकरणातील श्रावण बोरकडे, सचिन महाजन, अतुल इंगळे व गजानन जाधव यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्‍त करण्यात आले. 

Tags :  Accused, life imprisonment, Akkujs murder case, Crime