Sun, Mar 24, 2019 06:27होमपेज › Solapur › आगीत 5 दुकाने खाक

आगीत 5 दुकाने खाक

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 10:30PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

सांगोला शहरातील महूद रोडवरील शॉपिंग सेंटरमधे गुरुवारी रात्री शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत सुमारे 17 लाख 35 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली आहे. अग्निशमन दलाने त्वरित आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझवताना काही जण किरकोळ जखमा झाले.

सांगोला शहरातील वंदे मातरम् चौकातील स्वप्निल तुकाराम नवले यांचे सूर्या इलेक्ट्रॉनिक दुकान, तात्यासाहेब भीमराव देवकते यांचे राजमाता दूध एजन्सीचे दुकान, अमित अशोक पडवळे यांचे सिद्धनाथ इस्त्रीचे दुकान, कलावती पांडुरंग नवले यांची प्राजक्ता लेडीज शॉपी कापड दुकान व हणमंत दत्तू माळी यांचे समृद्धी किराणा व जनरल स्टोअर्स ही पाच दुकाने गुरुवारी रात्री शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गुरुवारी (दि. 30) रात्री 11.30 च्या सुमारास या दुकानांना अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. काही क्षणातच संपूर्ण दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि ज्वाळाचे लोटच्या लोट बाहेर पडत होते. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळ संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्या शॉपिंग सेंटरमध्ये आग लागली. त्या दुकानवरूनच  उच्च भार असलेली वीजवाहिनी गेली आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.  

नगरपालिकेचे अग्निशमन दल व स्थानिक नागरिक व तरुणानी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. अग्निशामन दलाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळविले; परंतु तत्पूर्वी पाचही दुकाने जळून खाक झाली होती. शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत स्वप्निल नवले यांचे 7 लाख, तात्यासाहेब देवकते यांचे 35 हजार, अमित पडवळे यांचे 2 लाख, कलावती नवले यांचे 4 लाख व हणमंत माळी यांचे 2 लाख असे एकूण पाच दुकानांचे 17 लाख 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत इलेक्ट्रॉनिक साहित्य, 
किराणा माल, लेडीज शॉपीतील साहित्य जळून खाक झाले.

घटनास्थळी आ.गणपतराव देशमुख व मा.आ.दीपकआबा साळुंखे-पाटील, आनंदा माने, नगराध्यक्षा राणीताई माने ,तहसिलदार संजय पाटील, पो.नि.राजकुमार केंद्रे यानी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. तलाठी विनोद भडंगे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून अहवाल तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे सादर केला आहे.