Wed, Jul 17, 2019 20:23होमपेज › Solapur › तडवळे येथील पोटनिवडणूक रद्द

तडवळे येथील पोटनिवडणूक रद्द

Published On: May 08 2018 10:40PM | Last Updated: May 08 2018 9:57PM वैराग : प्रतिनिधी

तडवळे (ता. बार्शी) येथील ग्रामपंचायतीच्या तीन जागांसाठी घोषित करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया राबवू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यपद रद्द झालेल्या रीता लोखंडे, नागनाथ पिसके व केशरबाई बनसोडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हे आदेश दिले. याचिकाकर्त्याच्यावतीने अ‍ॅड. नागराज शिंदे, तर सरकारतर्फे एच.एस. कंकाळ यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब विहित वेळेत सादर न केल्याच्या कारणावरून  जिल्हाधिकार्‍यांनी या तिघांचे सदस्यत्व रद्द केले होते. दरम्यान, रिक्‍त जागेचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला होता.

त्यामध्ये या तीन जागांसाठी 7 मेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, न्यायमूर्ती आर.डी. धनुका यांच्या न्यायालयात तिघांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यामध्ये हिशोब सादर करण्यास विलंब झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी विलंब क्षमापनासाठी अर्ज सादर करण्यास संधी दिली नाही, असा युक्‍तिवाद याचिकाकर्त्यातर्फे करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विलंब क्षमापन सादर करण्यास संधी दिली पाहिजे. याचिकाकर्त्यांना तसा अर्ज सादर करण्याची संधी असेल. जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या विलंब माफी अर्जाचा विचार करून पुनर्निर्णय द्यावा. त्यामुळे रिक्‍त जागांची निवडणूक घेऊ नये. याचिकाकर्त्यांनी 11 जूनला 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांसमोर हजर रहावे, जिल्हाधिकार्‍यांनी सुनावणीनंतर आठ आठवड्यात आपला निर्णय द्यावा, असे आदेश दिले आहेत.