होमपेज › Solapur › अखेर उजनी धरणातून शहरासाठी पाणी सोडले

अखेर उजनी धरणातून शहरासाठी पाणी सोडले

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 11:12PMसोलापूर :  प्रतिनिधी

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात आल्याने शहरावरील पाणीटंचाईचे सावट दूर झाले आहे.औज, चिंचपूर बंधार्‍यातील जलसाठा संपुष्टात आल्याने उजनीतून पाणी सोडण्याची मागणी मनपातर्फे पाटबंधारे विभागाला करण्यात आली होती; मात्र नेहमीप्रमाणे पाणी सोडण्याचा निर्णय वेळेवर घेण्यात आला नाही. टाकळी इनटेकमध्ये केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतके पाणी असल्याने शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता होती.  पाण्याच्या बिलावरून मनपा तसेच पाटबंधारे विभागात वाद असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उजनी धरणातून पाणी कधी सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  गुरुवारी दिवसभर उजनीतून पाणी सोडण्याची प्रतीक्षा होती. मात्र सायंकाळपर्यंत पाणी सोडण्यात आले नव्हते. पाटबंधारे विभागाकडून गुरूवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उजनी धरणातून विद्युत प्रकल्पासाठी 1600 क्युसेसचा विसर्ग सोडण्यात आला.  यानंतर शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात 4100 क्युसेसचा विसर्ग सोडण्यात आल्याची माहिती आहे. दुपारी 12 वाजल्यानंतर या क्युसेसमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे मनपाचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगितले.

दरम्यान, जादा क्युसेसने पाणी सोडले तर शहराला पाणी आठवड्याच्या आत पोहोचेल, असा अंदाज आहे. सुमारे सव्वादोनशे कि.मी.चा प्रवास करीत हे पाणी औजला पोहोचणार आहे. हे पाणी येईपर्यंत उपलब्ध पाण्यावर शहरवासियांना गुजराण करावी लागणार आहे.