Thu, Apr 25, 2019 13:47होमपेज › Solapur › नगरसेविकेच्या पतीसह 6 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

नगरसेविकेच्या पतीसह 6 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 11:29PMसोलापूर : प्रतिनिधी

केबल नेटवर्कमध्ये कामास येत नसल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबर मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेविकेच्या पतीसह सहा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे  सोलापुरात केबल वॉर भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. \

पोपट (दत्तात्रय) मेनकुदळे, सागर पिसे, अनिकेत पिसे व त्यांचे तीन साथीदार (रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत  शैलेश भानुदास भद्रे (वय 33, रा. यशनगर, सोलापूर) याने फिर्याद दाखल केली आहे. अनिकेत पिसे हे शिवसेना नगरसेविका सारिका पिसे यांचे पती आहेत.

शैलेश  भद्रे हा बीआरडीएस नेटवर्क या  केबल नेटवर्कमध्ये कामास असून  तो माणिक चौकातील नेटवर्कच्या  कार्यालयात इनचार्ज म्हणून काम करतो. गेल्या 15 दिवसांपूर्वी दत्तात्रय मेनकुदळे याने फोन करून शैलेश भद्रे यास संकेत हॉटेल येथे बोलाविले होते. संकेत हॉटेल येथे गेल्यावर दत्तात्रय मेनकुदळे, सागर पिसे, अनिकेत पिसे यांनी बीआरडीएस नेटवर्कमधील काम सोडून आमच्याकडील एबीएस नेटवर्कमध्ये कामास ये, असे सांगितले. त्यावेळी शैलेश भद्रे याने कामास येण्यास नकार दिल्यानंतर सागर पिसे याने तुला सांगितलेले समजत नाही का, तुझे बघावे लागेल, अशी दमदाटी केली होती. 

त्यानंतर    गुरुवारी रात्री साडेदहाच्या  सुमारास  शैलेश भद्रे हा दत्त  चौकातील  इन न्यूज ऑफिसमोरील बिल्डिंगसमोर मित्र कुरणे यांच्याशी बोलत थांबला होता. त्यावेळी सागर पिसे व इतर तिघेजण आले व त्यांनी शैलेश यास तू गाडीवर बस, दादा व पोपट  मेनकुदळे यांनी तुला संकेत लॉजवर बोलाविले आहे असे सांगितले. त्यावेळी शैलेशने येण्यास नकार दिल्यानंतर पिसे व इतरांनी त्यास जबरदस्तीने दुचाकीवर बसवून संकेत लॉजच्या बाजूच्या बोळात नेले. त्याठिकाणी अनिकेत पिसे व इतरांनी तू बीआरडीएसचे काम सोडून आमच्याकडे ये, असे धमकावले. त्यावेळी शैलेशने कामास येण्यास नकार दिल्यानंतर तिथे असलेल्या तरुणांनी शैलेश यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अनिकेतने शैलेशचे दोन्ही हात पकडून सागर यास याला मारून टाक, असे सांगितले. त्यावेळी सागर याने बाजूस असलेला लोखंडी पाईप उचलून शैलेश याच्या डोक्यात मारून त्यास जबर जखमी केले. त्यावेळी शैलेशचा मित्र कुरणे याने सोडवासोडवी करून शैलेशला नवी वेस पोलिस चौकीत नेले. 
जखमी अवस्थेत शैलेशला उपचारासाठी अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून शैलेश भद्रे याच्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चिंताकिंदी तपास करीत आहेत. 

केबलच्या व्यवसायातून यापूर्वीही अनेक भांडणे
मुंबईमध्ये तर केबल वॉरमधून अनेकांचा जीव गेला आहे. सोलापुरात केबल व्यवसायातून यापूर्वीही अनेक भांडणे झाली आहेत. केबलमधील कर्मचारी कामावर येण्यासाठी  तसेच  केबलची  वायर  तोडणे, केबल वायर चोरून नेणे, असे प्रकार घडलेले आहेत. 

Tags :  saolapur, corporate