Thu, Jul 18, 2019 20:49होमपेज › Solapur › बार्शीत दोन गटात तलवारीने मारहाण, सातजण जखमी 

बार्शीत दोन गटात तलवारीने मारहाण, सातजण जखमी 

Published On: Jun 04 2018 11:55PM | Last Updated: Jun 04 2018 11:55PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

पाठीमागील भांडणाच्या किरकोळ कारणावरून दोन गटात तलवार, लोखंडी गज व लाकडी दांडक्यांनी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील सातजण जखमी झाल्याची घटना बार्शी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घडली.  याप्रकरणी आठजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील 28 जणांविरूद्ध बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज तुकाराम गायकवाड (वय 22, रा. आझाद चौक, बार्शी)  यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार, 3 मे रोजी रात्री 11 वाजता बुरूड गल्ली भागात आपल्या मित्रांसमवेत थांबले असता आनंद पवार, आकाश पवार, अमोल पवार, शिरीष ताटे, आदित्य साळुंके, सागर साळुंखे व इतर अनोळखी 5 ते 6 जणांंनी तलवार, लोखंडी गज व लाकडी दांडके घेऊन, तुम्ही माजलायं आता तुमच्याकडे बघतो, असे म्हणून  सूरज गायकवाड व विकी दांडगे या दोघांना मारहाण करून जखमी केले.

विरोधी सागर सुभाष साळुंखे  (वय 23,  रा. गवत गल्ली, कुर्डुवाडी रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या मित्रांसमवेत गवत गल्ली बार्शी येथे थांबले असता कृष्णा रजपूत, विकी दांडगे, सूरज गायकवाड, ओंकार डिकुळे, सोनु डोंगरे, अनिकेत कडवे, अभिजित कारंडे, राहुल अनभुले, महादेव चव्हाण, गणेश झोडगे व अन्य 5 ते 6 जणांनी तलवार, लोखंडी गज, लाकडी दांडक्यांनी मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत त्यांच्यासह त्यांचा भाऊ आदित्य साळुंके, आनंद पवार, आकाश पवार व अमोल पवार यांना मारहाण करून जखमी केले. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील 28 जणांविरूद्ध बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड व संदीप जोरे करत आहेत.