Wed, Feb 20, 2019 09:12होमपेज › Solapur › सोलापुरात दोन पोलिस अधिकाऱ्यांच्यातच हाणामारी

सोलापुरात दोन पोलिस अधिकाऱ्यांच्यातच हाणामारी

Published On: Apr 21 2018 12:26PM | Last Updated: Apr 21 2018 12:43PMसोलापूर : प्रतिनिधी

पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानासमोर असलेल्या वसंत नगर पोलिस लाईनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकामध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बझार पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरेखा देविदास करंडे (वय 36, रा. बिल्डींग नं. 1, रूम नं. 7, वसंत नगर पोलिस लाईन, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन सहायक पोलिस निरीक्षक भांबड व त्यांचा मुलगा हर्ष (रा. पीएसआय बिल्डींग, वसंत नगर, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हर्षवर्धन विश्‍वास भांबड  याच्या फिर्यादीवरुन देविदास करंडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुरेखा यांचे पती देविदास करंडे हे पोलिस उपनिरीक्षक असून हर्षवर्धन याचे वडील विश्‍वास  भांबड हे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयामध्ये कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी हर्षवर्धन हा आर्यन करंड याच्यासोबत क्रिकेट खेळण्यावरुन बाचाबाची झाली होती. तो प्रकार मिटला होता. परंतु, आर्यनचे वडील देविदास करंडे हे मैदानात येऊन माझ्या मुलास का चिडवतोस असे म्हणून त्यांनी हर्षवर्धन यास विनाकारण हाताने गालावर चापट मारून शिवीगाळ केली. म्हणून हर्षवर्धन याने सदर बझार पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक करंडे यांच्याविरुध्द फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून सहाय्यक पोलिस निरीक्षक भांबड व त्यांचा मुलगा हर्ष हे करंडे यांच्या अल्पवयीन मुलीला व मुलाला गोल फेर्‍या मारुन अश्‍लिल शब्द बोलत होते. त्यावेळी करंडे यांच्या पत्नीने भांबड यांना असे का बोलता असे विचारले असता भांबड यांनी त्यांना शिवीगाळ करुन निघून गेले. त्यानंतर शुकवारी रात्री करंडे  हे मुलांसोबत बाहेर जात असताना भांबड व त्यांच्या मुलाने मुलांना अश्‍लिल बोलून चिडवून करंडे यांना तुला माज आला आहे, तुझा माज उतरवितो असे बोलून अपमान करुन शिवीगाळ केली. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात करंडे यांच्या पत्नीने फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांमधील धुसपूस सर्वपरिचित असताना आता खालच्या अधिकार्‍यांमध्येही हाणामारीसारख्या घटना  होऊ  लागल्या  आहेत. ‘सद्रक्षाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणार्‍या पोलिस दलातीलच अधिकारी आता सामान्यांप्रमाणे हाणामार्‍या करू लागल्यामुळे या पोलिस अधिकार्‍यांकडून जनतेचे काय संरक्षण केले जाणार? असा प्रश्‍न सामान्यांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आयुक्तालयाची अब्रु वेशीवर टांगली जात आहे, हे मात्र नक्की.