Wed, Aug 21, 2019 19:02होमपेज › Solapur › खंडाळी येथे दोन गटांत वादातून तणाव

खंडाळी येथे दोन गटांत वादातून तणाव

Published On: May 18 2018 12:34AM | Last Updated: May 18 2018 12:28AMटाकळी सिकंदर : वार्ताहर

मौजे खंडाळी (ता. मोहोळ) येथे चौकात फलक लावण्याच्या कारणावरून दोन समाजांतील गटांत वादावादी झाल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंडाळी गावात महापुरुषाच्या जयंतीची पूर्वतयारी सुरू होती. जयंतीनिमित्त चौकात उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, या जागेच्या जवळपास दुसर्‍या गटातील लोकांनी एक फलक लावला. 

या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला. या वादामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, गुरुवारी दिवसभर गावातील सर्व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले. काही ठिकाणी किरकोळ दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. फलक लावण्यावरुन वाद मागील दोन दिवसापूर्वी एका गटाने या चौकात एक शुभेच्छा फलक लावला होता. हा फलक हटवावा अशी मागणी महापुरुषाची जयंती साजरी करणार्‍या दुसर्‍या गटातील नागरिकांनी केली होती. त्यांनी याबाबत पोलिस स्टेशनला पत्रही दिले होते. या पत्राची दखल घेऊन पोलिसांनी हे दोन्ही वादग्रस्त फलक हटविले. या कारणावरुन दोन गटांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. गुरुवारी दोन गट चौकात आमनेसामने आले होते. वातावरण तणावपूर्ण बनत असल्याने पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली.

स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेले दोन्ही गटातील कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दोन गटात बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटात झालेल्या दगडफेकीत काही घरांसह दुकानांचे नुकसान झाले. या घटनेत एका महिलेसह काहीजण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्यासह जिल्हाधिकारी राजेेंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी भोसले यांच्या उपस्थितीत गावात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.