Tue, Jul 16, 2019 09:39होमपेज › Solapur › शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा ३० जूनपर्यंत मिळणार

शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा ३० जूनपर्यंत मिळणार

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 9:25PMसोलापूर : प्रतिनिधी 

राज्यातील ज्या शेतकर्‍यांचे कर्ज दीड लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा शेतकर्‍यांनी उर्वरित रक्कम येत्या 30 जूनपर्यंत भरली तर त्यांना दीड लाख रुपयांचा फायदा होणार आहे अन्यथा त्यांना एक दमडीही मिळणार नसल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी स्पष्ट केले. यामध्ये सोशल मीडियावर काही अफवा पसरविल्या जात असून त्यामुळे बँकांच्या कर्ज वसुलीवर विपरित परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सध्या सोशल मीडिया विविध शासकीय योजनांसाठी फायद्याचा ठरत आहे तेवढाच त्यांचा तोटाही होत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीविषयी सोशल मीडियावर संपूर्ण कर्जमाफी शासनाने दिल्याची बातमी फिरत आहे. मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असून शेतकर्‍यांनी शासनाच्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांनी उर्वरित रक्कम येत्या 30 जूनपर्यंत बँकेत भरणे अपेक्षित असल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. शासनाने दीड लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत कर्जमाफी दिली आहे.  

तर उर्वरित कर्जाची रक्कम येत्या 30 जूनपर्यंत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. त्यामध्ये आजतागायत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पात्र असलेल्या शेतकर्‍यांपैकी 476 शेतकर्‍यांनी तीन कोटी 90 लाख 23 हजार 184 रुपयांचा भरणा केला आहे.तर त्या शेतकर्‍यांना 5 कोटी 62 लाख 73 हजार 392 रुपये इतकी कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खोट्या अफवांवर विश्‍वास न ठेवता संबंधित बँकांमध्ये जाऊन खात्री करावी तसेच शासनाने जाहीर केलेल्या अटी व नियमांचे पालन करुन कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक देशमुख यांनी केले आहे.