Mon, May 20, 2019 10:04होमपेज › Solapur › शेतकर्‍यांचे प्रश्‍न, विकासाचे मुद्दे बाजूलाच; वैयक्‍तिक हेवेदाव्यांवरच रंगताहेत प्रचार सभा

शेतकर्‍यांचे प्रश्‍न, विकासाचे मुद्दे बाजूलाच; वैयक्‍तिक हेवेदाव्यांवरच रंगताहेत प्रचार सभा

Published On: Jun 25 2018 1:54AM | Last Updated: Jun 24 2018 8:46PMसोलापूर ः महेश पांढरे 

प्रचाराला जोर चढला असून सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना आघाडीच्या पॅनेलकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी  झडत आहेत. मात्र शेतकर्‍यांच्या विकासाचा आणि त्यांना सेवासुविधा पुरविण्याचा मुद्दा प्रचारात न बोलता सध्या वैयक्‍तिक हेव्यादाव्यांवर आणि बाजार समिती आर्थिक गैरव्यवहारावरच बोलले जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

दक्षिण आणि उत्तर सोलापूर कार्यक्षेत्र असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांना शेतकरी भवन, स्वस्तात जेवण, शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षणासाठी राहण्याची सोय, शेतकर्‍यांच्या मुला-मुलींच्या लग्नकार्यासाठी मंगलकार्याची व्यवस्था, मोठ्या शेतकर्‍यांचा मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आयात-निर्याती विषयीचे मार्गदर्शन केंद्र, अशा अनेक गोष्टी  बाजार समितीच्या माध्यमातून होणे अपेक्षित असताना दोन्ही पॅनेलकडून या विषयांना बगल देण्यात आली आहे.  भ्रष्टाचार कसा केला, शेतकर्‍यांची लूट कशी केली, त्यांना जेलची हवा खाऊ घालू, त्यांना अद्दल घडवू, अशाप्रकारची भाषा  प्रचारात आहे. 

शेतकरी हिताचे कोणी काहीच बोलत नसलयाने शेतकरी या निवडणुकीपासून चार हात लांबच असल्याने पुढार्‍यांची चांगलीच धावपळ होत आहे. राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी गावोगावच्या स्थानिक पुढार्‍यांची धावपळ सुरू आहे. शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने मतदार शेतकर्‍यांनी आता गाव पुढार्‍यांना चांगलाच फाटा दिला असल्याचे दिसून येत आहे. मात्र प्रचारासाठी आलेल्या नेतेमंडळींना आपले राजकीय वजन दाखविण्यासाठी गाव पुढार्‍यांनी आता सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या हाता-पाया पडून प्रचार सभेला अथवा नेत्यांच्या स्वागताला येण्याची विनंती करण्याची वेळ आली आहे.

थेट शेतकर्‍यांना अधिकार, गाव पुढार्‍यांचे महत्त्व झाले कमी

बाजार समितीच्या निवडणुका पूर्वी मोजक्याच लोकांमध्ये व्हायच्या. यामध्ये विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक आणि ग्रामपंचायतीचे सदस्य एवढेच मतदार होते. मात्र आता सर्वसामान्य शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने गाव पुढार्‍यांचे महत्त्व कमी झाल्याचे दिसते. दुसरीकडे आलेल्या नेतेमंडळींना आपले गावातील राजकीय वजन दाखविण्यासाठी या नेतेमंडळींची मोठी धडपड सुरू झाली असली तरी मतदारांमधून त्यांना अधिक महत्त्व मिळाल्याचे दिसून येत नाही.