Sat, Mar 23, 2019 00:32होमपेज › Solapur › खडकाळ माळरानावर फुलविली बागायती शेती

खडकाळ माळरानावर फुलविली बागायती शेती

Published On: Mar 11 2018 11:24PM | Last Updated: Mar 11 2018 11:13PMनळदुर्ग : शिवाजी नाईक

शेतमजूर असलेल्या कोरडवाहू शेतकर्‍याने ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली विहीर पुनर्भरण करून संपूर्ण शेती बागायत केल्याने शेती उत्पन्न वाढून आर्थिक विकास साधल्याची सकारात्मक बाब आलियाबाद (ता. तुळजापूर) स्मार्ट गाव शिवारात घडून आली आहे.

आलियाबाद स्मार्ट गावातील शिवाजी हिरा चव्हाण हे शेतमजुरी करून वीस वर्षांपूर्वी गावच्या शिवारात डोंगराळ भागातील काही शेतजमीन विकत घेतली. पाण्याअभावी शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतीतून नगण्य उत्पादन होत असल्याने चव्हाण यांनी स्वखर्चाने 52 फूट खोल विहीर घेतली. मात्र सुरूवातीपासून अखेरपर्यंत पाषाण लागल्याने पाणी लागले नाही. जेमतेम साळीचे पाच पायली उत्पन्न मिळत होते. गतवर्षी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच ज्योती चव्हाण, ग्राम विकास अधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रो.ह.योजनामधून 15 हजार अनुदान घेऊन एकूण पाऊण लाख रूपये खर्चून  विहिरीच्यावर शेतात पूर्व दिशेला 5 फूट खोल व 300 फूट लांब आणि 5 फूट रूंदीची मोठी चर खोदून त्यात दगड गोटे 3 फूटापर्यंत भरून 4 इंची पाईप विहिरीपर्यंत टाकले. त्यामुळे गतवर्षीपासून सतत 2 इंच पाण्याची धार विहिरीत पडत आहे. 

त्यात अद्यापपर्यंत कसलाही खंड पडला नाही. त्यामुळे विहीर काटोकाठ पाण्याने भरलेली आहे. या पाण्यावर त्यांची शेती संपूर्ण बागायत झाल्याने गहू, ऊस, कांदा आदी पिके घेत आहेत. पूर्वी फक्त साळीचे नाममात्र उत्पन्न मिळायचे, आता मात्र वरील पीक लागवडीमुळे वर्षाकाठी 4 लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे बोलताना शिवाजी चव्हाण या शेतकर्‍याने सांगितले.