होमपेज › Solapur › कांदा लिलाव सुरू; शेतकर्‍यांत समाधान

कांदा लिलाव सुरू; शेतकर्‍यांत समाधान

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 10:05PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या वतीने पुढाकार घेत कांदा लिलाव बुधवारी सुरू करून शेतकर्‍यांना योग्य दर मिळवून दिल्याबद्दल बाजार समितीचे सचिव विनोद पाटील यांचा सत्कार बुधवारी शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात आला. मंगळवारी बाजार समितीमध्ये मध्यरात्री अचानक कामगारांनी काम बंद करत भीमा कोरेगाव येथील दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्‍त करून कांदा ट्रक अनलोड न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकर्‍यांनी संतप्त होत प्रशासक भवनसमोर निदर्शने केली आणि घेराव घातला. दुपारपर्यंत सर्वत्र असेच वातावरण होते.
 

पोलिस आणि बाजार समिती प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी कामगार व शेतकरी यांच्यात यशस्वी मध्यस्थी केली आणि दुपारनंतर कामगार, शेतकर्‍यांनी ट्रक अनलोड करीत कांदा सेल हॉलमध्ये उतरवला. रात्रीसुद्धा कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. सुमारे 325 ते 350 ट्रक कांदा  अनलोड करण्यात आला. या कांद्याना भावसुद्धा चांगला मिळाला. सुमारे 4 हजार 400 ते 500 रुपये दर शेतकर्‍यांना मिळाला. यामुळे शेतकर्‍यांनी समाधान दर्शवत आनंद व्यक्त केला. 

पोलिस यंत्रणेचे सहकार्य प्रशासनाला लाभले आणि याच गोष्टीची शेतकर्‍यांनी कृतज्ञाता व्यक्‍त करत सचिव विनोद पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक गुरुदत्त माढेकर, पोलिस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलिस उपनिरीक्षक विशाल दांडगे  आदींचा यथोचित सत्कार केला. यावेळी शेतकर्‍यांनी बाजार समिती, पोलिस यंत्रणा आणि सोलापूरकर यांची प्रशंसा व कौतुक करताना  खर्‍याअर्थाने आज बाजार समिती ही  पहिल्या क्रमांकावर असल्याचे गौरवोद‍्गार काढले. राहण्याची, जेवणाची, व्यवस्था उत्तम केली आणि महत्त्वाचे म्हणजे भाव हे उच्चांकी मिळवून दिले. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी  विनोद पाटील यांनी बोलताना  या व्यवस्थित  बसलेल्या घडीला पोलिस अधिकारी, कर्मचारी, बाजार समितीमधील कर्मचारी, शेतकरी व कामगार या सर्व घटकांमुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवता आले. एक दिवसाची सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असली तरी आज बुधवारी भाव हे वाढलेले आहेत. व्यवहार सुरळीत सुरु असून संपकरी कामगारांवर कायदेशीर कारवाई करू असे, स्पष्ट केले.