Wed, Jul 17, 2019 12:13होमपेज › Solapur › शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने पोटात का दुखतंय? : शरद पवार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने पोटात का दुखतंय? : पवार

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 08 2018 8:00AM

बुकमार्क करा
पंढरपूर: प्रतिनिधी

कोरेगाव भीमाची दंगल पूर्वनियोजित होती. बाहेरहून आलेल्या लोकांनी दंगल घडवली, असे दोन्ही बाजूने स्थानिक लोक सांगत आहेत. तेव्हा सरकारने त्या अदृश्य शक्तीचा शोध घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीला विरोध करणाऱ्यांनाही टोला लगावला. शेतकरी कर्जमाफीने पोटात दुखणारी मंडळी राष्ट्रीयकृत बँकांना तोटा भरुन काढण्यासाठी केंद्राने ८० हजार कोटी रुपये दिल्यानंतर गप्प का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अकलूज येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे , विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते . 

पवार म्हणाले की, शेतकऱ्याच्या सोसायटीचे पैसे भरायला पैसे नाहीत. मग  बँकांची तूट भरायला पैसे कोठून आले? शेतकरी कर्जमाफीने कोणाच्या कितीही पोटात दुखले तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, त्यांच्या डोक्यावरचे ओझे उतरवून त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका पवार यांनी मांडली. 
देशाच्या कृषी आणि आर्थिक धोरणावर सडकून टीका करताना देशाचा आर्थिक दर घसरला असून, कृषी आणि औद्योगिक उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला असल्याचे पवारांनी सांगितले. तसेच नवीन करप्रणाली , नोटा बंदीचे परिणाम आता दिसू लागले असून, देशाची परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे पवार म्हणाले. नागपूर अधिवेशनानंतर दोन्ही काँग्रेस एकत्रित आले असून आता या सरकारच्या विरोधात एकत्रित काम करण्याची भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.