Sun, Aug 25, 2019 02:33होमपेज › Solapur › सोलापूर : नापिकीमुळे मोहोळ येथे शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीमुळे मोहोळ येथे शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: May 16 2019 4:43PM | Last Updated: May 16 2019 4:56PM
 मोहोळ : वार्ताहर

शेताच्या नापिकीमुळे एका ४३ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.१६ ) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील नागनाथ गल्ली परिसरात घडली. पवन उर्फ साईनाथ हनुमंत गायकवाड (रा. नागनाथ गल्ली मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पवन उर्फ साईनाथ हनुमंत गायकवाड यांच्या शेतात दुष्काळामुळे काहीच पिकले नाही. सततच्या नापीकीमुळे त्यांना दारुचे व्यसन लागले होते. तसेच त्यांची पत्नी मुलासह माहेरी गेल्यामुळे घरी कोणीच नव्हते. गुरुवारी (ता.१६ ) सकाळी साडेआठ वाजता त्यांनी घरात कोणी नसल्याने नैराश्येपोटी साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला. यावेळी त्यांच्या घरातून आवाज येत असल्याने नातेवाईकांनी धाव घेत घराचा दरवाजा मोडून आत प्रवेश करुन त्यांचा गळफास सोडवून उपचारासाठी तात्काळ मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

या प्रकरणी प्रशांत गायकवाड यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या माहीतीनुसार अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक अभिजीत गाटे हे करीत आहेत.

चार महिन्यातील तिसरी शेतकरी आत्महत्या

गेल्या चार महिन्यात मोहोळ तालुक्यातील एकूण तीन शेतकऱ्यांनी नापिकी, कर्ज बाजारीपणा आणि शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने आत्महत्या केल्या आहेत. ०६ फेब्रुवारी रोजी दाईंगडेवाडी(ता. मोहोळ) येथील शेतकरी म्हाळाप्पा हरिबा मोटे यांनी कांद्याला योग्य दर न मिळाल्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. तर ७ मे रोजी येणकी (ता. मोहोळ) येथील तुकाराम निवृत्ती माने यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर १६ मे रोजी मोहोळ येथील साईनाथ गायकवाड यांच्या आत्महत्येमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. ही बाब फारच गंभीर आहे. त्यामुळे सरकारने वेळीच शेती विषयक धोरण राबवून शेतकरी आत्महत्या थांबविण्याची गरज आहे.