Fri, Jul 19, 2019 07:23होमपेज › Solapur › पारेवाडीतील महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन

पारेवाडीतील महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन

Published On: Jan 05 2018 1:29AM | Last Updated: Jan 04 2018 10:08PM

बुकमार्क करा
करमाळा : तालुका प्रतिनिधी

केत्तूर येथील शेतकर्‍यांच्या शेतीचा वीजपुरवठा थकीत वीज बिले न भरल्याच्या कारणाने गेल्या पंधरा दिवसांपासून बंद केला होता. त्यामुळे खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेकडो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांची उभी पिके धोक्यात आली होती. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या भागातील केत्तूर, पारेवाडी, दिवेगव्हाण, उंदरगाव, मांजरगाव, पोमलवाडी, हिंगणी आदी गावातील शेतीची वीज गेल्या पंधरा दिवसांपासून बंद होती. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने तालुका अध्यक्ष अतुल राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

आंदोलक शेतकर्‍यांसमवेत सहाय्यक अभियंता व्ही.डी. वंजारी यांच्या पारेवाडी येथील कार्यालयात जाऊन शेतकर्‍यांचा खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत चर्चा करून सुरू करण्यासाठी आवाहन केले. परंतु वरिष्ठ अधिकार्‍यांचे जोपर्यंत आदेश येत नाहीत. तोपर्यंत वीजपुरवठा चालू करता येत नसल्याचे सहाय्यक अभियंता वंजारी यांनी सांगितले. पण जोपर्यंत या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा चालू होत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व शेतकर्‍यांसमवेत येथेच बसून राहणार, येथून हालणार नाही, असा पवित्रा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घेतला. यावेळी सर्व शेतकर्‍यांनी महावितरणच्या कार्यालय आवारात ठिय्या आंदोलन मांडले. कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा चालू करण्यास भाग पाडू, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे सर्व शेतकर्‍यांनी सहाय्यक अभियंता व्ही. डी. वंजारी यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांचा आक्रमक पवित्रा बघून वीजपुरवठा चालू करण्याची अनुकुलता सहाय्यक अभियंता वंजारी यांनी दाखवली व संबंधित लाईनमन व ऑपरेटरना वीजपुरवठा चालू करण्याचे आदेश दिले. मांजरगाव व रिटेवाडी येथील वीजपुरवठा लगेच सुरु करण्यात आल्याने तेथील शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त करून प्रहार संघटनेचे आभार मानले.

यावेळी हिंगणीचे सरपंच हनुमंत पाटील, केत्तूर वि.वि. का. सो.चेअरमन हनुमंत कानतोडे, नागनाथ खाटमोडे, प्रहार सोशल मीडिया प्रमुख विकी मोरे, निलेश पवार, हरिश्‍चंद्र मगर, शहाजी कोकणे, धनाजी मोहिते, रिटेवाडीचे सरपंच दादासाहेब कोकरे, बाळासाहेब जरांडे, आबासाहेब येडे, महावीर राऊत, दादासाहेब खाटमोडे, उदयसिंह राऊत, नवनाथ चव्हाण, रोहित मगर, अभिजित निकम, संजय सारंगकर, पठाण गुरुजी, शहाजी रिटे, श्रीकांत सरडे, किरणकुमार निंबाळकर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकर्‍यांच्या पिकांचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला होता. शासनाने वीजपुरवठा सुरळीत करावा आणि शेतकर्‍यांना पुन्हा आंदोलन करण्यास भाग पडू नये.हा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे खंडित करू नये, असे सरपंच हनुमंत पाटील यांनी सांगितले.