Sun, May 19, 2019 22:53होमपेज › Solapur › शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारमध्ये : सदाभाऊ खोत

शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारमध्ये : सदाभाऊ खोत

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 11:37PMकरमाळा : प्रतिनिधी

शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मी सरकारमध्ये काम करत आहे. या सरकारने आतापर्यंत शेतकर्‍यांना कर्जमाफी, वीज बिल, जलसंधारणाची अनेक कामे केलेली असताना शेतकर्‍यांकरिता लढत राहणे हा माझा धर्म आहे, असे प्रतिपादन सहकार, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

कंदर येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे गणेश मंगवडे, जिल्हाध्यक्ष सुहास भोसले, प्रा. सुहास पाटील, सरपंच भांगे, आदिनाथचे उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे, बाळासाहेब गायकवाड, अजय बागल, अण्णा पवार उपस्थित होते.

ना. खोत म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर मनापासून प्रेम केलेले आहे. त्यांच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यांचे उपकार मी विसरू शकणार नाही. शेतकर्‍यांच्या हितासाठी आपण गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर उतरून लढा देत आलो आहे. आज सरकारमध्ये काम करत असताना या सरकारने शेतकर्‍यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. विशेषत: कर्जमाफीसारखी योजना राबवून शेतकर्‍यांना न्याय दिला आहे.

एफ.आर.पी. प्रमाणे जे कारखाने उसाला भाव देणार नाहीत, अशा कारखान्यांवर शासनाची करडी नजर असून शेतकर्‍यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी मी कटिबध्द आहे. आज व्यक्तिगत आकसापोटी माझ्यावर आरोप करून मला अडचणीत आणण्याचे काम काहीजण करत असताना मी अशांना भिक घालणार नाही. मी लढणारा कार्यकर्ता असून सत्तेसाठी नव्हे, तर शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारमध्ये सामील होऊन काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.