Sat, Jul 20, 2019 02:31होमपेज › Solapur › पुनर्विवाह केलेल्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन

पुनर्विवाह केलेल्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 8:43PMसोलापूर : प्रतिनिधी

पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने पुनर्विवाह केला असेल तर त्या विधवा पत्नीला कुटुंबनिवृत्तीवेतनाचा लाभ देण्याचे धोरण शासनाच्या वित्त विभागाने ठेवले आहे. मात्र त्या विधवेने दुसरे लग्न केले आणि पहिल्या पतीपासून जर मुलं असतील तर कुटुंबनिवृत्ती वेतनामध्ये त्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम  1982 मधील नियम 116(5)(एक) मध्ये काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार 11 जून 2015 पूर्वी या अधिसूचनेनुसार पुनर्विवाह केलेल्या विधवांना कुटुंबनिवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या कुटुंबनिवृत्तीवेतन धारक विधवांनी अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी पुनर्विवाह केल्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने त्यांचे निवृत्तीवेतन बंद करण्यात आले होते. अशा विधवांना अधिसूचनेच्या दिनांकापासून अर्थात 11 जून 2015 पासून पुन्हा कुटुंबनिवृत्ती वेतन देण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीची थकबाकी त्यांना मिळणार नाही. त्यासाठी ज्या महिलांचे पती ज्या शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत होते, त्या कार्यालयाच्या प्रमुखांकडे कुटुंबनिवृत्ती वेतन पुन्हा सुरु करण्यासाठी पूर्वीच्या पीपीओ नंबरसह अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तर असा अर्ज आल्यानंतर कार्यालयप्रमुखाने अधिदान व लेखा अधिकारी कोषागार अधिकारी यांच्याकडून संबंधित कुटुंबनिवृत्ती वेतनधारकास अंतिम अदा केलेल्या कुटुंबनिवृत्ती वेतनाचे प्रमाणपत्र तसेच वेतनाचे प्राधिकारपत्र प्राप्त करून घ्यावीत. कुटुंबनिवृत्ती वेतनाचे अंतिम प्रमाणपत्र व कुटुंबनिवृत्ती वेतनाचे अधिकारपत्र यासह सुधारित प्रस्ताव कार्यालयप्रमुखाने महालेखापाल कार्यालयाकडे पाठवून द्यावेत. त्यावर महालेखापाल कार्यालयाने जुने प्राधिकारपत्र रद्द करून सुधारित प्राधिकारपत्र मंजूर करण्याची कार्यवाही करावी. जर पुरुष कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतर त्याच्या पुनर्विवाह केलेल्या विधवेस पूर्वीच्या पतीपासून अपत्य असतील, तर त्या विधवा पत्नीला कुटुंबनिवृत्ती वेतन न देता त्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.