Tue, Jul 23, 2019 02:54होमपेज › Solapur › फेसबुक हॅक करून मोदी, योगींना हत्येची धमकी!

फेसबुक हॅक करून मोदी, योगींना हत्येची धमकी!

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 26 2018 1:16AMसोलापूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फेसबुकवर हत्येची धमकी दिल्याच्या कारणावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी गोपनीयरीत्या टेंभुर्णी येथील 28 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन गाझियाबादला नेले होते. याबाबत कुठेही वाच्यता न करण्याचे धोरण जिल्हा पोलिसांनी स्वीकारले होते; मात्र भारतीय जनता पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट टाकल्याने ही माहिती उघड झाली व एकच खळबळ उडाली होती. सखोल चौकशीअंती या तरुणाचे फेसबुक अकाऊंट हॅक करून ही धमकीची पोस्ट टाकण्यात आल्याचे उघड झाले असून लवकरच उत्तर प्रदेश पोलिस ताब्यात घेतलेल्या तरुणाची सुटका करणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश 
प्रभू यांनी सांगितले. बापू कुबेर राजगुरू असे संबंधित तरुणाचे नाव असून तो मूळचा मोहोळ तालुक्यातील येवती येथील रहिवासी आहे. तथापि, टेंभुर्णी येथील अकोले खुर्द येथे तो शेतीकामानिमित्त राहात आहे. बापू राजगुरू 

याच्या फेसबुक अकाऊंटवरून मोदी व योगींच्या हत्येची पोस्ट प्रसारित झाली होती. त्यामुळे तो पोलिस व गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आला होता. गाझियाबाद पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर परिसरात आले होते. सायबर सेलच्या पोलिसांनी राजगुरू याला माढा तालुक्यातून ताब्यात घेतले होते व त्याला गाझियाबाद येथे तपासासाठी नेण्यात आले होते. अर्थात, ही कारवाई अत्यंत गोपनीयरित्या करण्यात आली होती. या कारवाईवरून सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याची काळजी तपासयंत्रणा घेत होत्या. परंतु भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर मोदी हत्येच्या कटप्रकरणी संशयित तरुणास अटक यासंदर्भात पोस्ट टाकली तसेच या तरुणाला टेंभुर्णीतून ताब्यात घेतल्याचेही जाहीर केले. त्यामुळे या कारवाईला वाच्यता फुटली व सोलापुरात एकच खळबळ उडाली. प्रसारमाध्यमांनी जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांना विचारणा केली असता या कारवाईची अधिकृत माहिती दिली. राजगुरू याचे अकाऊंट हॅक करून ही पोस्ट टाकण्यात आली असून प्रथमदर्शनी राजगुरू याचा काही दोष नसल्याचे दिसत आहे. गाझियाबादसह सायबर सेलच्या पोलिसांनी मूळ आरोपीदेखील शोधून काढला आहे. तो उत्तर प्रदेशातीलच रहिवासी आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले. उत्तर प्रदेश पोलिस बापू राजगुरू याची लवकरच सुटका करतील, असेही त्यांनी सांगितले. 

टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक आनंद खोबरे यांनीदेखील युपी पोलिसांच्या कारवाईबाबत माहिती दिली. आपण गाझियाबाद पोलिसांशी संपर्क साधला असून त्यांनी बापू राजगुरू याची चौकशी पूर्ण झाली असल्याचे सांगितले आहे. हत्येची धमकी देणारा राजगुरू नसून ती व्यक्ती उत्तर प्रदेशातीलच असल्याचे तेथील पोलिस ठाणे अधिकार्‍यांनी आपणास सांगितले आहे, असेही पीआय खोबरे यांनी सांगितले. दरम्यान, मुलास अचानक अटक करण्यात आल्याने राजगुरू यांच्या आई-वडिलांनी चिंता व्यक्त केली असून त्याच्या सुखरुप सुटकेसाठी पोलिसांना विनवणी केली आहे. आपला मुलगा शेतीकामास असून तो असा काही प्रकार करणार नाही, असेही या पालकांनी सांगितले.