Fri, Nov 16, 2018 06:39



होमपेज › Solapur › शेतकरी फसवणूक प्रकरणी आमदार बबनराव शिंदेंवर गुन्‍हा

शेतकरी फसवणूक प्रकरणी आमदार बबनराव शिंदेंवर गुन्‍हा

Published On: Jun 23 2018 12:33AM | Last Updated: Jun 23 2018 12:33AM



माढा : वार्ताहर

शेतकरी आणि सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि जि.प. सदस्य रणजितसिंह शिंदेंवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. माढा येथील जगदंबा सूतगिरणीची मालमत्ता व मशिनरीची बेकायदा खरेदीविक्री व खादी ग्रामोद्योग मंडळाचे बोगस लाभार्थी दाखवून कर्जवाटप करून शेतकरी व सरकारची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  या २०८ कोटी रूपयांच्या फसवणूक प्रकरणी माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माढा न्यायालयात नागनाथ उद्धव कदम (रा उपळाई खुर्द) यांनी फिर्याद दाखल केली होती. त्या फिर्यादीनुसार माढ्याच्या प्रथम वर्ग न्यायाधीश मनिषा थोरात यांनी या प्रकरणी माढा पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार  फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३)प्रमाणे भारतीय दंड विधान कलम ४०९, ४२०, ४६४, ४६५, ३४ प्रमाणे चौकशी करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, उपळाई खुर्द येथील नागनाथ उध्दव कदम यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याबाबत स्थानिक ठिकाणी संबंधितांकडे दाद मागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या सर्व प्रकरणात पहिल्यांदा पोलिसांकडे कदम यांनी दाद मागितली होती. त्यानंतर कार्यवाही होत नसल्याने त्यांनी याबाबत माढा न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्या प्रकरणी माढा न्यायालयाने यातील आरोपींवर गुन्हे दाखल करुन तपास करून दोन ते तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश माढा पोलिसांना दिले आहेत. 

यासंदर्भात नागनाथ कदम यांच्या फिर्यादीनुसार सन २००६ ते २०१७ या दरम्यान यातील आरोपी संदीपान भगवान थोरात हे जगदंबा अनुसूचित जाती जमाती शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी माढाचे संस्थापक चेअरमन असताना पदाचा गैरवापर करून सूतगिरणीची मशिनरीची विनापरवाना विक्री केली. तसेच संदीपान थोरात व आमदार बबनराव शिंदे यांनी पदाचा गैरवापर करून सूत गिरणी माढा येथील ६ हेक्टर ६१ आर जमीन व इमारत ही मालमत्ता बेकायदेशीररित्या खोटे दस्त करून रणजितसिंह शिंदे यांना ३ कोटी रूपयांना विक्री केली.

बबनराव शिंदे यांनी खादी ग्रामोद्योग महामंडळकडून जे शेतकरी व शेतमजूर नाहीत अशा लाभार्थींच्या नावे पाच कोटी रुपये उचलले व त्याचा अपहार केला. बबनराव शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे दोनशे कोटी रूपयांचे शेअर्स शेतकर्यांना विक्री करून शेअर्स सर्टिफिकेट व नफा दिलेला नाही.तसेच आमदार बबनराव शिंदे व रणजितसिंह शिंदे यांनी खाजगी साखर कारखान्याकरीता शेतकर्यांना दहा हजार ते सत्तर हजार रूपये प्रमाणे शेअर्स विक्री केली व शेअर्स सर्टिफिकेट व नफा दिलेला नाही व या रकमेचा अपहार केला. अशा प्रकारे या प्रकरणात संदीपान थोरात, बबनराव शिंदे व रणजितसिंह शिंदे यांनी 208 कोटी रूपयांचा अपहार करून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास माढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहेत.