होमपेज › Solapur › कार्यकारी संपादक, पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा असहकार आंदोलन!

कार्यकारी संपादक, पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा असहकार आंदोलन!

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 10:34PMसोलापूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक तसेच क्राईम रिपोर्टरवर पोलिस उपायुक्तांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करीत सोलापुरातील पत्रकारांनी पोलिस आयुक्तांना लेखनस्वातंत्र्यावरील मुस्कटदाबी बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. हे गुन्हे मागे न घेतल्यास पोलिसांशी असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारादेखील यावेळी देण्यात आला. याप्रसंगी शहर व जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. पोलिस आयुक्तालयातील वातावरण दूषित झाले असून जनता व पोलिस यांच्यातील समन्वय हरपला आहे. पोलिस आयुक्तालयात जे काही सुरू आहे ते पत्रकारांनी बाहेर आणले तर पोलिसांची प्रतिमा मलिन होईल, असा सूचक इशाराही यावेळी पत्रकार संघटनांनी पोलिस आयुक्तांना याप्रसंगी दिला. 

पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेची बातमी प्रसिध्द केल्याने दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक व क्राईम रिपोर्टर अमोल व्यवहारे यांच्याविरोधात गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी शहरातील सदर बझार पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल केला आहे. अत्यंत गंभीर अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या निषेधार्थ  सोलापूर  श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, सोलापूर  क्राईम असोसिएशन, सोलापूर महानगरपालिका  पत्रकार संघ, सोलापूर जिल्हा परिषद पत्रकार संघ, सोलापूर प्रेस फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर संघाच्यावतीने पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार  संघाचे  पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार राकेश  टोळ्ये, सोलापूर  श्रमिक  पत्रकार  संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे,  जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनिष केत, क्राईम असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कदम, महापालिका संघाचे सचिव राजकुमार सारोळे, जिल्हा परिषद संघाचे संतोष आचलारे, दक्षिण सोलापूर पत्रकार संघाचे संजीव इंगळे यांच्यासह पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी  ज्येष्ठ  पत्रकार  राकेश टोळ्ये यांनी पत्रकारांवर थेट गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची कृती ही चुकीची असल्याचे सांगितले. यावेळी राकेश टोळ्ये यांना उच्च न्यायालयातील निवाड्यांचा   हवालादेखील दिला.  ज्येष्ठ पत्रकार एजाज  मुजावर  यांनी  आयुक्तालयाच्या कारभाराची घडी विस्कटल्याचे सांगून शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत व त्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिस दाखवित नसल्याचे सांगितले. जर प्रसारमाध्यमांनी अवैध धंद्यांबाबत लिखाण केले तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पोलिस अधिकारी गाडीत घालून फिरवतात व कुठे अवैध धंदे आहेत, असे विचारतात. बातमी छापून आल्यानंतर प्रशासनाकडून त्याबाबत कोणतेही  उत्तर  न  देता थेट  गुन्हा दाखल   करताना पोलिस  प्रशासनाकडून प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कांबळे यांनी सांगितले. लोकशाहीमध्ये पत्रकारांनी आपली जबाबदारी पार पाडत असताना बाजू मांडण्याऐवजी त्यांच्यावर  खटले दाखल  करणे म्हणजे लोकशाहीचा अवमान असल्याचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे हा गुन्हा त्वरित मागे घ्यावा, असे सांगत पोलिस आयुक्त तांबडे यांना निवेदन दिले. 

याप्रसंगी दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापक हेमंत चौधरी, सहाय्यक संपादक पुरुषोत्तम सांगळे,  दरशथ वडतिले, पत्रकार संघाचे सचिव उमेश कदम, संघाचे माजी अध्यक्ष मनोज व्हटकर, प्रशांत माने, संजय पवार, आयुब कागदी,  सरदार अत्तार, भरतकुमार मोरे, माधव येचे, अरूण रोटे, गणेश गुडमी, जहाकिरहुसेन  पीरजादे, किरण बनसोडे, संदीप वाडेकर, मिलिंद  राऊळ, प्रमिला चोरगी, सुमित वाघमोडे, रणजित वाघमारे, इरफान शेख,  राहुल रणदिवे, नितीन पात्रे, सुनील कदम, वैभव गंगणे, अजित उंब्रजकर, बाळासाहेब मागाडे, चंद्रकांत मिराखोर, दीपक शेळके, महेश पांढरे, प्रसाद कानडे, रामकृष्ण लांबतुरे, सादिक  इनामदार  यांच्यासह शहरातील विविध दैनिकांमधील ज्येष्ठ  पत्रकारांसह विविध संघटनांमधील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.