Wed, Apr 24, 2019 19:43होमपेज › Solapur › शहराला दररोज पाणीपुरवठा मृगजळ ठरू नये !

शहराला दररोज पाणीपुरवठा मृगजळ ठरू नये !

Published On: Aug 15 2018 1:27AM | Last Updated: Aug 14 2018 11:22PMदीपक होमकर 
देशातील शंभर ‘स्मार्ट सिटी’मध्ये सोलापूर शहराची वर्णी लागली आणि  सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेेंट कॉर्पोरेशन तयार झाले. आता याला दोन वर्षे होऊन गेली आणि ‘स्मार्ट सिटी’च्या अनेक योजना कागदावरून थेट रस्त्यावर दिसायला लागल्या. त्यातील सर्वच कामे ही संथगतीने का होईना, पण सुरु आहेत. त्याचा मोठा दिलासा सोलापूरकरांना आहे. 

मात्र सर्वात सुखद निर्णय कोणता असेल तर तो म्हणजे दररोज पाणीपुरवठ्याचा. केवळ गावठाण भाग (एबीडी) नव्हे तर चार-पाच वर्षांत हद्दवाढ भागासह संपूर्ण सोलापूरला तासभर का होईना मात्र दररोज पाणीपुरवठा देण्यात महापालिकेतील भाजपच्या सत्तेला शक्य झाले तर मोदींनी अकाऊंटमध्ये पंधरा लाख का टाकले नाही याचा जाबसुध्दा सोलापूरकर विचारणार नाहीत इतका आनंद सोलापूरकरांना होईल. मुळात ‘स्मार्ट सिटी’चे सर्वात महत्त्वाकांक्षी विकासकाम म्हणजे पाणीपुरवठा, मलनि:सारण, रस्ते आणि त्यानंतर इतर पथदिवे, इमारती, बागांचे सुशोभिकरण. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आयुक्‍त ढाकणे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पाणीपुरवठा रोज करण्याच्या प्रक्रियेवर अगदी युद्धपातळीवर काम सुरु झाले आहे. मात्र ‘अडातच नाही, तर पोहर्‍यात कुठून येणार’, अशी गत असल्याने उजनीतून सोलापूरपर्यंत येणार्‍या पाण्याचा सोर्स वाढविण्यासाठी दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर होणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडून 200 कोटी आणि एनटीपीसी प्रकल्पाकडून 250 कोटींचा निधी देण्यात येणार असला तरी सात-साडेसातशे कोटींच्या या कामासाठी आणखी अडीच-तीनशे कोटींची रक्कम कमी पडणार आहे. 

मध्यंतरीच्या काळात महापौरांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे नेला व त्यांनी याला मंजुरी देताना तीनशे कोटी रुपये राज्य सरकारकडून देण्याची घोषणाही केली. त्यामुळे मुंबईतून गूड न्यूज आणलेल्या सत्ताधारी टीमने महापालिकेत फटाके उडवून अनेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. मात्र या घटलेला आता चार-सहा महिने झाल्यानंतर आणि स्मार्ट सिटी व एनटीपीसीकडून येणार्‍या निधीची प्रक्रिया सुरु झाली तरी राज्य सरकार मात्र या विषयावर काहीच बोलत नाहीत. त्यामुळे ही दुहेरी जलवाहिनीसाठी लागणारा सुमारे तीनशे कोटींचा निधी कुठून उभा राहणार, हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरित आहे. 

त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत एबीडी एरियात आहे त्याच पाण्याची काटकसर करून दररोज पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्यानंतर तातडीने हद्दवाढ भागातही दररोज पाणीपुरवठा झाला नाही तर त्यांना सापत्नपणाची वागणूक दिली गेल्याची भावना तयार होईल व ते भाजपसाठी हिताचे ठरणार नाही. त्यामुळे दररोज पाणीपुरवठ्याची योजना मृगजळ ठरू नये. यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा गरजेचा आहे.