Mon, May 20, 2019 11:13होमपेज › Solapur › उजनीतील तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी समितीचे गठण

उजनीतील तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी समितीचे गठण

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 8:54PMसोलापूर : महेश पांढरे 

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावरील जलाशयावर 1000 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणार्‍या बाबींचा अभ्यास करून त्याची अमंलबजावणी निश्‍चित करण्यासाठी शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्यावतीने समिती गठीत करण्यात आली असून ही समिती येत्या दोन महिन्यांत आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे.

जलाशयावर 1000 मे. वॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी महावितरण कंपनीस परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने काही सूचना शासनाच्यावतीने मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रकल्पासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्यासाठी लागणार्‍या बाबींचा अभ्यास करणे, कामकाजाची पद्धत, कार्यपद्धती, अंमलबजावणी या गोष्टींचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच ही समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीने या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि जलाशयावर होणारा परिणामांचा अभ्यास करणे तसेच यासाठी विविध विभागांकडून लागणार्‍या परवानग्या मिळविणे, जलाशयातील पाण्याच्या पातळीत होणारा बदल लक्षात घेऊन याचा महिनानिहाय आलेख तयार करणे, या प्रकल्पासाठी आवश्यक ती निष्कासन व्यवस्था उपलब्ध करून  समितीने या प्रकल्पाचा बृहत आराखडा  येत्या दोन महिन्यांत शासनाला सादर करावयाचा आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या जलाशयावर आता 1000 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.

अशी आहे समिती 

वाणिज्य विभागाचे संचालक सतीश चव्हाण अध्यक्ष, मुख्य अभियंता स्टेट ट्रान्समिशन युनिट, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे, संचालक पर्यावरण विभाग, महाऊर्जा सचिव, अतिरिक्‍त महासंचालक महाऊर्जा हे सर्व सदस्य असणार आहेत.