Mon, Jul 22, 2019 03:42होमपेज › Solapur › पर्यावरणप्रेमी आगळावेगळा गणेश भक्त

पर्यावरणप्रेमी आगळावेगळा गणेश भक्त

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 8:03PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

‘ओ इतकी महाग मूर्ती असते का?...  कमी करा की काय तर... शेवटचे सांगा... नाही तर दुसरीकडे जातो...’, असा संवाद गणेश मूर्ती घेताना हमखास कानी पडतो.  गणपती बाप्पालाही  स्वत:चे मूल्य ठरवत असलेले ऐकवत नसेल. मात्र यावर उपाय म्हणून एक गणेश भक्त पुढे सरसावला असून त्याने स्वखुशीने पैसे डब्यात टाकून हवी ती मूर्ती घेऊन जाण्यास सांगतोय. हे गेल्या चार वर्षांपासून चालू आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून तो ‘गणेश मूर्ती आमची, किंमत स्वखुशीने तुमची’ या सेवाभावी, नि:स्वार्थी भावनेने   होटगी रस्त्यावरील महिला हॉस्पिटलजवळ राहणारे मिलिंद माईणकर काम करीत आहेत.  ते स्वत: मूर्ती बनवत नाहीत. बाहेरून छोट्या मूर्ती आणून देतात. एका डब्यात स्वखुशीने रक्कम टाक म्हणतात. पुढच्या वर्षी त्याच रकमेतून आणखी मूर्ती आणतात. 

यात हजार-पाचशे रुपयांचा तोटाच होतो. मात्र यातून मिळणारा आनंद वेगळाच असल्याचे सांगतात. यंदाच्या चौथ्या वर्षी  इको-फ्रेंडली गणेश मूर्ती  म्हणजे शाडूने  बनवलेल्या मूर्तीच देण्याचे ठरवले आहे. पहिल्या वर्षी 25 मूर्ती, दुसर्‍या वर्षी 51, आता चौथ्या वर्षी 100 मूर्ती देण्याचे ठरवले आहे.  यंदा मिलिंद माईणकर हे  इको-फ्रेंडली गणेश मूर्ती उपलब्ध करणार आहेत. त्यांनी लष्करमधून एका मूर्तीकारांकडून मूर्ती करुन घेणार आहेत.  गणेशाच्या मूर्तीचे भाव न सांगता या मूर्ती स्वखुशीने घेऊन भक्तिभावाने व श्रद्धेने प्रतिष्ठापना करा, असा संदेश  मिलिंद आपल्या कृतीतून देत आहेत. हा उपक्रम ते गेल्या चार वर्षांपासून राबवत होते. 

मात्र मागील तीन वर्षे पीओपी मूर्ती होत्या. यंदा प्रथमच इको-फ्रेंडली गणेश मूर्ती उपलब्ध करत आहेत. माईणकर हेे मूर्तीकार नाहीत, पण सामाजिक उपक्रमातील सहभागासाठी त्यांनी हा मार्ग निवडला. श्रीकांत माईणकर, अंजली माईणकर, मिलिंद माईणकर, तृप्ती माईणकर हे संपूर्ण कुटुंब गणेशोत्सवातील सामाजिक उपक्रमात कृतीद्वारे सहभागी होत आहेत. होटगी रोड येथील महिला हॉस्पिटलच्या मागे बंगल्यात हा उपक्रम यंदा  सप्टेंबरपासून सुरू होत आहे. 

सहा इंच ते एक फुटापर्यंतच्या या इको-फ्रेंडली घरगुती मूर्ती आहेत तसेच बुकिंग करून ठेवण्याची सोय आहे.  माईणकर यांच्या मदतीला यूथ फोर डेव्हलपमेंट धावली आहे. त्यांच्यातर्फे इको-फ्रेंडली मूर्ती हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संघटनेचे प्रा. अनिकेत चनशेट्टी, प्रा. हिंदूराव गोरे, रोहित जक्कापुरे, प्रज्ञा पाटील, वीरेश माने, नितीन बाणेगाव, प्रतीक भडकुंभे, स्नेहा सिंदगी, सतीश आनंद, मिलिंद माईणकर, राकेश टेळे आदी प्रयत्नशील आहेत. 

पर्यावरणपूरक विचाराला आर्थिक पाठबळ 
मिलिंद माईणकर ही कोणी मोठी व्यक्ती नाही. खासगी नोकरी करून संसार चालवणारा तरूण आहे. ते सध्या शिवशाही फौंड्रीत काम करीत आहेत. त्यांच्या या पर्यावरणपूरक कामाची माहिती मिळाल्याने त्यांना यूथ फोर डेव्हलपमेंटबरोबरच लष्कर येथील मॉडर्न हायस्कूल, किर्लोस्कर कंपनीतील आणि शिवशाही फौंड्री येथील मित्रवर्गाने काही आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यांच्या नि:स्वार्थ भावनेला थोडे बळ मिळाले आहे. त्यांनी मूर्तीबरोबर प्लास्टिक पिशवी न देता कापडी पिशवी देऊन त्यात श्रीफळ, उदबत्तीचा पुडा देण्याचे ठरविले आहे.