होमपेज › Solapur › रोजगार हमी ठरतेय कुचकामी

रोजगार हमी ठरतेय कुचकामी

Published On: May 29 2018 1:27AM | Last Updated: May 28 2018 10:59PMकलेक्टर कचेरीतून : महेश पांढरे

बेरोजगारांना काम मिळावे तसेच शासनाच्या निधीतून अनेक समाजोपयोगी कामे व्हावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेला सध्या जिल्ह्यात उतरती कळा लागली आहे. शासनाने ज्या उद्देशाने ही योजना सुरु केली त्या उद्देशापासून आता ही रोजगार हमी योजना भरकटली आहे. नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही रोजगार हमी योजना सध्या ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ ठरत आहे. बेरोजगारांना वर्षभरातून किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध व्हावा तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली होती. यामध्ये सुरुवातील अनेक लोकोपयोगी कामे झाली. यामध्ये जवळपास गावच्या विकासासाठीच्या सर्वच बाबींवरती काम करता येते.

जनावरांच्या गोठ्यापासून ते सांडपाणी व्यवस्थापन, कंपोस्ट खतनिर्मिती, पाणंद रस्ते, शिव रस्ते, पाझर तलाव, शेतकर्‍यांसाठी फळलागवड, बांधबंदिस्ती, शेततळे, शोषखड्डे अशी अनेक कामे यामध्ये अंर्तभूत केली आहेत. शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या घरकुल योजगा आणि विहिरीच्या योजनेसाठीही रोजगार हमीतून आर्थिक मदत करण्याचे धोरण शासनाने ठेवले आहे. मात्र सध्या याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यासाठी संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेल्या ग्रामसेवक आणि रोजगारसेवकांनी मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ही योजना जवळपास बंद पडण्याच्या मार्गावरच आहे. गावातील विकासाचा दुवा असणार्‍या ग्रामसेवकांमध्ये रोजगार हमी योजनेविषयी प्रचंड उदासीनता आहे. कामचुकार ग्रामसेवकांसाठी रोजगार हमीची कामे गावात सुरु करणे म्हणजे मोठे संकटच वाटत आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द योजना राबविणार्‍यांनीच याकडे पाठ फिरविल्याने गावकर्‍यांना या योजनेची व्यवस्थित माहिती मिळत नाही आणि त्यामुळे त्या योजना गावांपर्यंत पोहोचत नाहीत.

त्यामुळे रोजगार हमी योजनेला सोलापूर जिल्ह्यात सध्या घरघर लागली आहे. अनेक गावांमध्ये ग्रामरोजगार सेवक नेमण्यात आलेले नाहीत आणि ज्याठिकाणी नेमण्यात आले आहेत त्याठिकाणी कामच नाही. त्यामुळे गावच्या विकासाचा कायापालट करण्याची मोठी संधी गावकर्‍यांना असतानाही केवळ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही योजना सध्या मोडकळीस आली असून यामध्ये ग्रामरोजगार सेवक आणि ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी गावातील लोकांनी नियोजन करुन स्वत:ची कामे करुन उर्वरित वेळेत जर रोजगार हमीतून काही कामे केल्यास त्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे आणि शासनाचा निधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे थोडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून ग्रामसेवक आणि रोजगारसेवक यांच्या समन्वयातून काही कामे हाती घेतल्यास जिल्ह्यातील गावांचा कायापालट निश्‍चित होणार, यामध्ये कोणतेच दुमत राहणार नाही.