Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Solapur › राष्ट्रीय बँकांतील कर्मचारी व अधिकारी असुरक्षित

राष्ट्रीय बँकांतील कर्मचारी व अधिकारी असुरक्षित

Published On: Jun 06 2018 10:27PM | Last Updated: Jun 06 2018 8:40PMसोलापूर : इरफान शेख

राष्ट्रीयीकृत बँकेत काम करणारे अनेक कर्मचारी व अधिकारी असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.कारण नागरिकांशी थेट संपर्क होत असल्याने अनेकवेळा हल्ले व धमक्या मिळत असल्याची तक्रार एका बँक अधिकार्‍याने संपात बोलताना सांगितली. सोलापूर जिल्ह्यात असे प्रकारदेखील घडले आहेत. भविष्यातसुध्दा असे प्रकार घडतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

देशात बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कार्पोरेशन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, विजया बँक, कॅनरा बँक असे एकूण 27 शासकीय बँका आहेत. ज्या भारत सरकारच्या नियंत्रणाखाली काम करतात. या 27 बँकांच्या शाखा सोलापुरात कार्यरत आहेत.

पूर्वी बँकांमध्ये बोटावर मोजण्याइतके नागरिक जात होते.परंतु काळानुसार परिस्थिती बदलत गेली. प्रत्येक शासनाने आपल्या ध्येयधोरणात महत्त्वपूर्ण बदल केले. बँकांमधून व्यवहार वाढले. शासकीय बँकांचे कामकाजदेखील वाढले. यामुळे शासकीय बँकांमधील गर्दी आपोआप वाढत गेली. वाढत्या गर्दीचा विचार करुन म्हणावी तेवढी नोकरभरती करण्यात आली नाही.

1984 पासून 2010 पर्यंत म्हणावी तेवढी भरती झालीच नाही.त्यामुळे मोजक्या बँक कर्मचार्‍यांवर गर्दीचा ताण निर्माण झाला. कामाचा व्याप वाढल्याने कामे लवकर पुढे सरकणे अवघड झाले आहेे. त्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा त्रास होऊ लागला. कामे लवकर होत नसल्याने नागरिक संतापून थेट बँक कर्मचारी व अधिकारी यांच्यावर आपला राग व्यक्त करु लागले. सोलापूर जिल्ह्यात व शहरात अनेकवेळा बँक कर्मचारी व  अधिकारी यांच्यासोबत नागरिकांच्या हमरीतुमरी होऊन किरकोळ हाणामारी व अनेकवेळा हुज्जतदेखील झाली आहे.  ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बँकांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे. दिरंगाईने होत असलेल्या कामाबद्दल शासकीय बँकांची विश्‍वासार्हता कमी होत गेली.

राजकारणामुळे गल्लीबोळात राजकीय नेते निर्माण झाले. नागरिक त्यांकडे बँकांच्या तक्रारी घेऊन जाऊ लागले. त्यामुळे  या गल्लीबोळांतील नेत्यांचासुध्दा दबाव निर्माण होऊ लागला आहे. नागरिक बँक कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून उलट त्यांच्याविरोधात तक्रार करु लाागले आहेत. बँकेच्या व्यवस्थापकांचे देखील काम वाढले. 8 तासांची ड्यूटी 10 ते 12 तासांवर पोहोचली. बँक कर्मचार्‍यांची सोशल लाईफ नाहीशी होऊन फक्त प्रोफेशल लाईफ निर्माण झाली आहे. बँकेत येणार्‍या प्रत्येक नागरिकास शासकीय बँकांवरील विश्‍वास कमी होत जाऊन कामे लवकर होत नाहीत, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे बँकेत येणारा प्रत्येक ग्राहक हा बँकेबद्दल नकारात्मक भूमिका घेऊनच प्रवेश करत आहे. कामामध्ये थोडीसुध्दा दिरंगाई झाल्यास सरळ तक्रारीची धमकी देत आहेत व बँक कर्मचार्‍यांशी अरेरावीची भाषा करत आहेत. त्यामुळे बँक कर्मचारी व अधिकारी अस्वस्थ होत चालले आहेत.

अशी परिस्थिती राहिल्यास शासकीय बँकांत नोकरी करण्यास कोणी पुढे येणार नाही. कारण सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करत करत बँकाच्या नाकीनऊ आले आहे. त्यात कर्जप्रकरणे आदी कामांचा बोजा निर्माण झाल्याने बँक कर्मचारी पूर्णत: खचून गेले आहेत.

नागरिकांच्या रोषाला सामोरेे जाऊन बँक कर्मचार्‍यांचा व अधिकार्‍यांचा उद्रेक निर्माण होऊन बँकिंग व्यवस्था एके दिवशी पूर्णत: कोलमडेल, हे मात्र नक्की.