Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Solapur › आषाढीसाठी जि. प. मध्ये आपत्कालीन प्रशिक्षण

आषाढीसाठी जि. प. मध्ये आपत्कालीन प्रशिक्षण

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 08 2018 11:00PMसोलापूर ः प्रतिनिधी

आषाढी वारीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दरवर्षी वारकर्‍यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हाभरातील आरोग्य कर्मचारी नेमले जातात. वारीनिमित्त येणार्‍या वारकर्‍यांना आपत्कालीन परिस्थितीत आरोग्याच्या सुविधा देण्याचे प्रशिक्षण रविवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आरोग्य कर्मचार्‍यांना देण्यात आले. 

पालखींचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाल्यापासून त्या पंढरपुरात दाखल होईपर्यंत आरोग्य कर्मचारी हे वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. वारकर्‍यांची वारी ही आरोग्यदायी व्हावी, यासाठी त्यांच्या आजारपणात सुश्रृषा करण्यापासून त्यांना आजार होऊ नये, यासाठी पाणी शुध्दीकरण, परिसर स्वच्छता, धूर फवारणी यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागामार्फत राबविल्या जातात. 

आषाढी वारीनिमित्त होणार्‍या गर्दीचा विचार करता रुग्णवाहिका प्रत्येक वारकर्‍यापर्यंत पोहोचू शकत नाही. यासाठी गेली तीन वर्षे आरोग्य दूत ही संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये दोन आरोग्य कर्मचारी मोटारसायकलवर पुरेशा औषध सामग्रीसह वारकर्‍यांना गर्दीच्या ठिकाणी पोहोचून आरोग्य सुविधा पोहोचवतात. आवश्यकता भासल्यास त्यांना मोटारसायकलवरून तातडीने रुग्णालयात संदर्भसेवेसाठी पोहोचवले जाते. यावेळी जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी जलजन्य आजार व साथीचा आजार पसरु नये याबाबत कोणती काळजी घ्यावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा राबवाव्यात याबाबत प्रशिक्षण दिले.

बी.व्ही.जी.ग्रुप तर्फे डॉ. अतुल वायकुळे, डॉ. अनिल काळे, डॉ. अनिष कुमार, डॉ. विनय यादव, विठ्ठल बोडके यांच्या टीमने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णास कसे हाताळायचे, कशा पध्दतीने सेवा द्यायची जेणेकरुन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचेपर्यंत रुग्णास प्रथमोपचार देवून त्याचे प्राण वाचविण्यास मदत होईल. या बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी बी.व्ही.जी. ग्रुपच्या प्रशिक्षक टीमच्या सर्व सदस्यांचे स्वागत करुन आरोग्य विभाग नेहमीच आषाढी यात्रा पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भाविक भक्तांना चांगल्या रितीने आरोग्य सुविधा पुरवित असल्याचे सांगितले.

प्रत्येक वर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवून वारकर्‍यांची वारी आरोग्यमयी करण्याचा जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करीत असते. यावर्षी आरोग्य कर्मचार्‍यांना फर्स्ट रिस्पॉन्स ट्रीटमेंन्ट कशी द्यावी याबाबत प्रशिक्षण दिलेले आहे. आरोग्य विभाग येणार्‍या आषाढी पालखी सोहळ्यास उत्तम आरोग्य सुविधा देण्यास सज्ज आहे. यावेळी डॉ. आर.एन. कुलकर्णी, डॉ. मदन देशपांडे, सिध्देश कट्टीमनी, केदार गद्दी, सचिन कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, त्रिमूर्ती राऊत उपस्थित होते.