Sun, Jul 21, 2019 12:02होमपेज › Solapur › केंद्राच्या १४ व्या वित्त आयोगाच्या योजनेत अपहार

केंद्राच्या १४ व्या वित्त आयोगाच्या योजनेत अपहार

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 9:55PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या योजनेत अपहार झाला असून 10 लाख 62 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उळे गावच्या महिला सरपंचासह तिच्या मुलाविरुद्ध सोलापूर  तालुका  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पद्मिनी रामचंद्र खंडागळे आणि ज्ञानेश्‍वर रामचंद्र खंडागळे (रा. उळे, ता. दक्षिण सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत उळ्याचे ग्रामसेवक बाळू चन्नप्पा चौगुले (वय 43, रा. तळेहिप्परगा, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

बाळू चौगुले हे उळे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. पद्मिनी खंडागळे या उळे गावच्या सरपंच असून ज्ञानेश्‍वर हा त्यांचा मुलगा आहे. उळे गावाच्या विकासासाठी शासनाकडून आलेली रक्‍कम ही बाळी वेस येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील बँक खात्यावर जमा होते. केंद्र शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या योजनेमध्ये बाळी वेस शाखेतील बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये लाखो रुपयांची रक्‍कम जमा झाली आहे. ही रक्‍कम सरपंच पद्मिनी  व त्यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर यांनी  ग्रामसेवक  चौगुले  यांच्या  बनावट सह्या मारून चेकने 8 नोव्हेंबर 2017 रोजी अरकाल ब्रदर्स, श्रीहरी हंचाटे, 15 नोव्हेंबर 2017 रोजी सीटीएस क्‍लिरिंग, 22 डिसेंबर 2017 रोजी व्यंकटेश अरकाल यांच्या नावे लाखो रुपयांच्या रकमा देऊन 10 लाख 62 हजार रुपयांचा अपहार केला म्हणून ग्रामसेवक चौगुले यांच्या फिर्यादीवरुन सोलापूर   तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. हवालदार गवळी तपास करीत आहेत.

दवाखान्यात औषध चोरणार्‍या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

जुळे सोलापुरातील शिवगंगानगरातील रिषभ नर्सिंग होममध्ये परिचारिका म्हणून कामास असलेल्या रेखा माणिक राठोड (रा. कमलानगर, विजापूर रोड, सोलापूर) या महिलेने 378 रुपयांच्या गोळ्या चोरल्याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. वर्षा गजानन पाटील (वय 37, रा. मंगल रेजेनस्सी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना 9 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. पोलिस नाईक वाल्मिकी तपास करीत आहेत.