Tue, Jul 07, 2020 20:08होमपेज › Solapur › कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या याद्या बँकेच्या नोटीस बोर्डावर

कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या याद्या बँकेच्या नोटीस बोर्डावर

Published On: Jan 25 2018 10:28PM | Last Updated: Jan 25 2018 9:54PMसोलापूर ः प्रतिनिधी   

सोलापूर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकर्‍यांना अर्जांमध्ये त्रुटी आणि चुकीची माहिती भरल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नाही अशा जवळपास 42 हजार शेतकर्‍यांच्या याद्या त्या त्या बँकेच्या शाखेवर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी स्वत: जाऊन पडताळणी करुन पाहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी केले आहे.

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंर्तगत अनेक शेतकर्‍यांना लाभ झाला असला तरी यामध्ये काही त्रुटी आढळल्याने काही शेतकर्‍यांपर्यंत हा लाभ पोहोचला नाही. अशा शेतकर्‍यांसाठी पुन्हा एकदा याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.त्या याद्या बँकेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी जाऊन शेतकर्‍यांनी आपल्या नावात अथवा भरलेल्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्या दूर करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. या याद्यांची तपासणी करुन पुन्हा त्या तालुकास्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. 

त्यानंतर त्याची तपासणी करुन त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी जागृत राहून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.